15 December 2018

News Flash

‘त्यांच्या’ आजोळच्या घरात यशवंतरावांचे स्मारक

खानापूर तालुक्यातील देवराष्ट्रे हे आधुनिक महाराष्ट्राचे जनक यशवंतराव चव्हाण यांचे जन्मगाव.

खानापूर तालुक्यातील देवराष्ट्रे येथील हे घर अजूनही कागदोपत्री शरद घाडगे आणि सुभाष घाडगे या दोन भावांच्या नावे आहे.

मात्र १७ वर्षे पाठपुरावा करूनही मोबदल्यापासून वंचितच

शहरात राहणाऱ्या आणि वर्षभरानंतर देवदर्शनासाठी गावी आलेल्या घाडगे कुटुंबाला त्यांचे सांगली जिल्ह्य़ातील देवराष्ट्रे येथील आजोळचे घर लोकनेते यशवंतराव चव्हाण यांचे राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित झाल्याचे दारावर लावण्यात आलेल्या नोटिशीवरून समजले. त्याचे त्यांना आश्चर्य वाटले आणि आनंदही झाला. स्मारक घोषित करण्यापूर्वी शासनाने नियमानुसार विहित मुदतीत हरकत घेण्याचे आवाहन संबंधितांना केले होते. मात्र ती अधिसूचना मिळू न शकल्याने घाडगे कुटुंबीय वेळेत प्रतिसाद देऊ शकले नाहीत. मात्र ही बाब लक्षात आल्यावर त्यांनी त्वरित पत्राद्वारे शासनाशी संपर्क साधून ‘हरकत नाही, मात्र घराचा मोबदला मिळावा,’ अशी अपेक्षा व्यक्त केली. मात्र गेली १७ वर्षे सांगली ते मुंबई दरम्यान शासनाच्या विविध खात्यांत पाठपुरावा करूनही त्यांना दाद मिळू शकलेली नाही.

खानापूर तालुक्यातील देवराष्ट्रे हे आधुनिक महाराष्ट्राचे जनक यशवंतराव चव्हाण यांचे जन्मगाव. ज्या घरात त्यांचा जन्म झाला, त्याच घरात शासनाने १७ वर्षांपूर्वी त्यांचे स्मारक उभारले आहे. मात्र स्मारकात रूपांतरित झालेले ते घर अजूनही कागदोपत्री शरद घाडगे आणि सुभाष घाडगे या दोन भावांच्या नावे आहे. त्यापैकी थोरले बंधू शरद घाडगे नोकरीनिमित्त ठाण्यात तर धाकटे सुभाष घाडगे कराडला असतात. ते दोघेही आता सेवानिवृत्त आहेत. शासनाने १६ जानेवारी २००१ रोजी कुणाचीही हरकत नसल्याने अंतिम अधिसूचना काढीत देवराष्ट्रे येथील घर यशवंतराव चव्हाण यांचे स्मारक म्हणून घोषित केले. तिथे आता यशवंतराव चव्हाण यांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन मांडण्यात आले आहे. वर्षभर हे घर बंद असल्याने स्मारकाच्या योजनेविषयी घाडगे बंधूंना त्याची कल्पना नव्हती.

यशवंतराव चव्हाण यांचा जन्म झालेले देवराष्ट्रे गावातील घर घाडगे बंधूंचे आजोळ आहे. यशवंतराव चव्हाण घाडगे बंधूंच्या आईचे मामा. त्यांचे बालपणही याच घरात गेले. या थोर व्यक्तीचे स्मारक आपल्या घरात होत असल्याच्या निर्णयाचे घाडगे बंधूंनी स्वागतच केले. त्या घराची रीतसर किंमत शासनाने द्यावी, इतकीच त्यांची अपेक्षा आहे. मात्र गेली १७ वर्षे शासनदरबारी हेलपाटे मारूनही ‘वेळेत हरकत नोंदवली नाही’, हे कारण देत शासनाने त्यांच्या साध्या मागणीकडे दुर्लक्ष केले आहे.

देवराष्ट्रे येथील ज्या घरात सध्या यशवंतराव चव्हाण यांचे स्मारक आहे, त्याचे आम्ही कायदेशीर वारस आहेत. आमची स्मारकाबाबत हरकत नाही, मात्र या थोर नेत्याचे स्मारक करताना शासनाने संबंधितांना नियमाप्रमाणे मोबदला मिळावा, इतकेच आमचे म्हणणे असून गेली १७ वर्षे आम्ही त्यासाठी पाठपुरावा करीत आहोत.  – शरद आणि सुभाष घाडगे

देवराष्ट्रे येथील यशवंतराव चव्हाण यांच्या स्मारकासाठी अद्याप भूसंपादनाचे काम बाकी आहे. ते पूर्ण होताच संबंधितांना मोबदला देण्याची प्रक्रिया सुरू होईल.

– अर्चना शेटय़े, तहसीलदार, खानापूर

 

 

First Published on March 11, 2018 2:30 am

Web Title: ghadge family home in sangli declare national monument of yashwantrao chavan