आशीष धनगर

डागडुजी, पाण्याची गळती अशा विविध कारणांमुळे गेल्या दोन वर्षांत बरेच महिने बंदच असलेल्या घोडबंदर येथील डॉ. काशिनाथ घाणेकर नाटय़गृहावर पुन्हा एकदा महिनाभर पडदा पडण्याची चिन्हे आहेत. नाटय़गृहाच्या आसन व्यवस्थेतील खुच्र्याच्या दुरुस्तीसाठी ते महिनाभर बंद ठेवण्यात येण्याची शक्यता आहे.

घोडबंदर भागातील नागरिकांची सांस्कृतिक भूक भागविण्यासाठी काही वर्षांपूर्वी डॉ. काशिनाथ घाणेकर नाटय़गृह उभारण्यात आले. मात्र दुरुस्तीच्या कामासाठी हे नाटय़गृह सातत्याने बंद ठेवावे लागत आहे. २०१६ मध्ये नाटय़गृहाचे छताचे प्लॅस्टर कोसळले होते. यामुळे दुरुस्ती कामासाठी नाटय़गृह वर्षभर बंद ठेवण्यात आले होते. तसेच गेल्या वर्षी नाटय़गृहातील लघू प्रेक्षागृहाच्या छतातून पाणी गळती होत होती. त्यामुळे हे प्रेक्षागृह दुरुस्त करण्यासाठी नाटय़गृह पुन्हा बंद ठेवण्यात आले होते. असे असतानाच आता खुच्र्याच्या दुरुस्ती कामाकरिता ठेकेदार नेमण्यासाठी महापालिकेने निविदा काढली आहे. येत्या दीड महिन्यात निविदा प्रक्रिया पूर्ण करून ठेकेदाराची निवड केली जाणार आहे. तसेच गणपत्तीच्या सुट्टीत नाटय़गृह बंद ठेवून खुच्र्याच्या दुरुस्तीची कामे केली जाणार आहेत. नाटय़गृहातील गॅलरीतील खुच्र्या या आरामदायी (पुश बॅक) नाहीत. या खुर्चावर बसल्यानंतर प्रेक्षक खुच्र्या मागे जोरात लोटतात. यामुळे या खुच्र्या तुटण्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे या खुच्र्याच्या दुरुस्ती व मजबुतीकरणाचे काम करण्यात येणार आहे. त्यासाठी १९ लाख २८ हजार रुपये खर्च केले जाणार आहेत. नाटय़गृहातील व्यवस्थापकांच्या कार्यालयात दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे.

ठाणे महापालिकेतर्फे उभारण्यात आलेल्या डॉ. काशिनाथ घाणेकर नाटय़गृहात स्वच्छतेचा अभाव आहे. तसेच नाटय़गृहात कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे. मात्र नको त्या ठिकाणी महापालिका अनावश्यक खर्च करते.

– विजू माने, नाटय़ आणि सिने दिग्दर्शक

डॉ. काशिनाथ घाणेकर नाटय़गृहाच्या सर्व खुच्र्याचे मजबुतीकरण आणि व्यवस्थापकांच्या कार्यालयाचे फर्निचर दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे. या कामासाठी नाटय़गृह बंद ठेवावे लागेल.

– रवींद्र खडताळे, नगर अभियंता, ठाणे महापालिका