‘मी तुझ्यावर प्रेम केले फार मोठी चूक केली’, ‘केवढी पुढे गेली माझी मजल घेतलीस माझी दखल’, ‘एक साध्या चेहऱ्याची केवढी भाषांतरे चेहऱ्यांच्या आत दडले चेहऱ्यांचे चेहरे’, ‘कुणास हा आठवून एकदा रडला पाऊस, अखेर त्याचे सुकले डोळे दमला पाऊस’सारख्या एकाहून एक सदाबहार गझलांच्या बरसातीत ठाणेकर रसिक चिंब भिजून गेले.
‘मोशाज’ आणि ‘शब्दांकित’ या गझलप्रेमी समूहाच्या वतीने सहयोग मंदिर येथे ‘गझल तुझी नि माझी’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी गोविंद नाईक, हेमंत राजाराम, मयूरेश साने, संचिता कारखानीस या डोंबिवलीतील गझलकारांच्या साथीने ठाण्याच्या जयदीप जोशी, बेळगावची पूजा भडांगे, पुण्याचे श्रीपाद जोशी यांनी आपल्या गझल सादर केल्या.
जयदीप जोशी यांनी सादर केलेली जिंकू किंवा मरू असे नाही, कुणावरही हसू नये, कुणासाठी रडू नये ही गझल सादर केली.  बेळगावच्या पूजा भडांगे हिने सीमावासीयांची व्यथा मांडणारी ‘मोकळा व्हावा आता हा श्वास सीमावासीयांचा पूर्ण होवो एकदाचा ध्यास सीमावासीयांचा’ ही गझल सादर केली.
गोविंद नाईक यांनी आयुष्यावर भाष्य करणारी ‘किती वर्षांने घेतले मांडीवर तुजला, पुन्हा येशील का रे लाडक्या आयुष्या’ ही गझल सादर करताच कार्यक्रमात अधिकच रंगत आली. श्रीपाद जोशींनी सादर केलेली ‘तुझ्या मनाचा पदर कधी का’, हेमंत राजाराम यांनी सादर केलेली ‘भुईला माहिती होते नदी का आटली होती’ मयूरेश साने यांनी सादर केलेली ‘ती तर निघून झळतो अजून रस्ता’, कारखानीस यांनी सादर केलेली ‘जे नको टाळण्यासाठी तुझा होकार नाही’, ‘सांगा ना वेडय़ा मना तू का तुला दार नाही’सारख्या गझला सादर केल्या.
याशिवाय ‘फस्त केले तू हे वादळ, कापलास नाही माझा गळा’, ‘वागेन ही तुझ्याशी वचने दिल्याप्रमाणे, ये भेट तू मला ही स्वप्नातल्याप्रमाणे’, ‘रेशमी केसातला मी मोगरा, माळून घे तू, काळजाचे बोट मी गाली तुझ्या लावून घे’, ‘एक विषारी झाड उगवलं आहे, नकोसा विषय वाढत होता, तुला पाहून माझा शब्द लाजला होता, मुका राहून माझा अबोला गाजवला होता’, नभातले चांदणे जरासे उरात मी शिंपडून आले तुझ्या न माझ्या मिठीतला चांदवा मी पेटवून आले’, ‘फूल-काटे, ऊन-वारे  झेलते माझी गझल पण, तरी गुलमोहरागत वाढते माझी गझल’सारख्या एकाहून एक गझला ऐकण्याची संधी ठाणेकर रसिकांना या निमित्ताने मिळाली.