एखाद्याच्या घरी जाताना मिठाई नेण्यापेक्षा पुस्तके घेऊन जावीत. पुस्तकांची भेट दिल्याने ती भेट अधिक स्मरणीय ठरू शकते. आपल्याकडे एलईडी आहे, महागडा स्मार्ट फोन आहे. यात आनंद मानण्यापेक्षा माझ्याकडे हजारो पुस्तके आहेत याचा अभिमान बाळगायला शिका, असे मत ठाण्याचे सहपोलीस आयुक्त व्ही. व्ही. लक्ष्मीनारायण यांनी व्यक्त केले. सुयश कला-क्रीडा मंडळाच्या वतीने आयोजित व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प लक्ष्मीनारायण यांच्या ‘समाजातील घडामोडी’ यावरील मार्गदर्शनपर व्याख्यानाने गुंफले गेले.
समाजात बदल होण्यासाठी कुटुंबात बदल व्हावे लागतात. कुटुंबात बदल होण्यासाठी व्यक्तीत बदल होणे आवश्यक असते. या सगळ्याच्या माध्यमातूनच देश बदलणे शक्य होईल. मात्र यासाठी प्रत्येकाने मनाशी ठाम निश्चय करणे महत्त्वाचे असते. आपण साक्षर झालो आहोत, मात्र सुशिक्षित होत नाही, अशी खंत व्यक्त करीत पालकांनी मुलांना चांगल्या गोष्टींचे वळण लावले पाहिजे. सर्वात आधी आपण स्वत:पासून सुरुवात केली पाहिजे, असा सल्ला त्यांनी पालकांना दिला. आपल्याकडे परीक्षेत किती मार्क मिळाले यामध्ये स्पर्धा असते. मात्र आपला मुलगा किती चांगला नागरिक झाला, त्याच्यावरचे संस्कार याविषयी कोणी विचार करत नाही. समाज सुधारण्यासाठी निर्माण होणारा चांगला नागरिक हा प्रत्येक घरातूनच तयार होत असतो. चांगला समाज निर्माण करणे हे कुटुंबाच्या हातात असते, असे लक्ष्मीनारायण यांनी सांगितले. गुन्हेगारांकडून नागरिकांची फसवणूक कशी केली जाते याविषयी सजगता निर्माण करण्यासाठी, सावधानतेसाठी ठाणे पोलिसांच्या वतीने दहा ध्वनिचित्रफिती प्रसारित करण्यात येणार असल्याची माहिती लक्ष्मीनारायण यांनी या वेळी दिली. यामुळे नागरिकांची फसवणूक होणार नाही. सायबर गुन्हे रोखण्यासाठी नागरिकांनी कोणालाही कार्ड किंवा पिन क्रमांक देऊ  नये, अशी विनंती केली. तसेच ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेसाठीदेखील आमचे बीट मार्शल कार्यरत असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले. तसेच नागरिकांच्या सुरक्षेसाठी चांगल्यासाठी केलेला कायदा तोडण्यात जेव्हा सामान्य नागरिकांचा सहभाग असतो. त्या वेळी त्याचा सर्वात अधिक त्रास हा पोलिसांना होतो, असे लक्ष्मीनारायण यांनी या वेळी नमूद केले.