पूर्वा साडविलकर / किशोर कोकणे

करोनाकाळात रोगप्रतिकारक शक्ती चांगली राहावी यासाठी विविध प्रकारच्या आयुर्वेदिक काढय़ांचे सेवन करण्याकडे लोकांचा भर वाढत चालला आहे. यापैकी बहुतांश काढय़ांमधील हमखास जिन्नस असलेले आले त्यामुळे भाव खाऊ लागले आहे. बाजारात आल्याची मागणी १५ ते २० टक्क्यांनी वाढल्याने वाशी एपीएमसीमधील घाऊक बाजारात आल्याचे दर किलोमागे दहा रुपयांनी वाढले आहेत. किरकोळ बाजारात तर विक्रेत्यांनी दर दुप्पट करून १४० ते १६० रुपये किलोने आले विकण्यास सुरुवात केली आहे.

करोना विषाणूचा संसर्ग होऊ नये म्हणून नागरिक आपापल्या स्तरावर खबरदारी घेत आहेत. तसेच विविध प्रकारच्या आयुर्वेदिक काढय़ांच्या सेवनावरही भर दिला जात आहे.

समाजमाध्यमांवर सातत्याने वेगवेगळय़ा प्रकारच्या काढय़ांच्या कृती प्रसारित केल्या जातात. नागरिकही त्यानुसार वेगवेगळे काढे करतात. यापैकी जवळपास सर्वच काढय़ांमध्ये आले हा हमखास घटक असल्याने गेल्या तीन-चार महिन्यांपासून आल्याच्या मागणीत १० ते २० टक्क्यांची वाढ झाली आहे.

मार्च महिन्यात नवी मुंबई येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये साताऱ्याहून येणाऱ्या आल्याचा दर ३४ रुपये किलो होता, तर बंगळूरुहून येणारे आले ५० रुपये किलो होते.

तसेच किरकोळ बाजारात आल्याची विक्री ५० ते ८० रुपये किलोने दराने केली जात होती. मात्र, करोनाच्या काळात मागणी वाढल्याने दरातही वाढ झाली आहे. एपीएमसीत सातारा येथून येणारे आले ५५ रुपये किलो दराने, तर बंगळूरु येथील आले ७० रुपये किलो दराने विकले जात आहे. तसेच किरकोळ बाजारात १४० ते १६० रुपये किलो दराने आल्याची विक्री करून ग्राहकांची लूट केली जात आहे.

बाजारात पूर्वीसारखाच आल्याचा पुरवठा होत आहे. मात्र, करोनाकाळात आल्याच्या मागणीत प्रचंड वाढ झाली असून त्या आल्याचा पुरवठा कमी पडू लागला आहे. त्यामुळे त्याच्या किमतीत वाढ झाली आहे.

– सुनील सिंगकर, उपसचिव, भाजी बाजार, एपीएमसी