News Flash

पहिल्या वर्षांचा अर्थसंकल्प शेवटच्या वर्षांत!

हंगामी अर्थसंकल्पावर गिरीश कुबेर यांचे मत

ठाणे भारत सहकारी बँकेच्या वतीने आयोजित कार्यक्रमात बँकेचे उपाध्यक्ष उत्तम जोशी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर देसाई यांनी ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांचे स्वागत केले.

हंगामी अर्थसंकल्पावर गिरीश कुबेर यांचे मत

ठाणे : सर्वाना आनंदी करण्याचा प्रयत्न स्वागतार्ह असला तरी पहिल्या वर्षांत मांडायला हवा होता तो अर्थसंकल्प नरेंद्र मोदी सरकारने शेवटच्या वर्षांत मांडला, असे मत ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी शुक्रवारी व्यक्त केले.

ठाणे भारत सहकारी बँकेतर्फे ‘केंद्रीय हंगामी अर्थसंकल्प २०१९-२०’ या विषयावर आयोजित व्याख्यानात गिरीश कुबेर यांनी अर्थसंकल्पातील विविध घोषणा आणि तरतुदींचा आढावा घेतला. बँकेचे उपाध्यक्ष उत्तम जोशी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर देसाई हेदेखील यावेळी उपस्थित होते.

‘मध्यमवर्ग आणि शेतकरी यांना या अर्थसंकल्पात बरेच काही दिले जाईल, अशी अपेक्षा होतीच. ती काही प्रमाणात पूर्ण झाली, याचे कारण जे दिले जाणार आहे ते अगदीच नगण्य आहे, पण प्रचंड काही दिले जाते असे दाखविले जाणार आहे. म्हणूनच हे सरकार मध्यमवर्गीय आणि शेतकऱ्यांना जे काही देऊ पाहते आहे, त्याची सुरुवात मोदी सरकारच्या पहिल्या वर्षांतच झाली असती तर त्याचा फायदा दोन्ही घटकांसह अर्थव्यवस्थेलाही झाला असता,’ अशा शब्दांत कुबेर यांनी अर्थसंकल्पाचे विश्लेषण केले. निवडणुकीच्या तोंडावरील अर्थसंकल्पात या घोषणा करण्यात आल्यामुळे त्यामागील हेतू, कारणे तसेच त्यांची परिणामकारकता याविषयी प्रश्न निर्माण होतात, असे मत त्यांनी मांडले.

पक्षविरहीतदृष्टीकोनातून अर्थसंकल्पाकडे पाहणे गरजेचे आहे. मतदार हाच महत्वाचा मानून त्या दृष्टीने अर्थसंकल्प असणे आवश्यक आहे. तसेच वस्तू व सेवा कराचे दर समान असणे गरजेचे आहे. पण आपल्या देशात ते शक्य होऊ शकले नाही, असे निरीक्षण कुबेर यांनी व्याख्यानात नोंदवले. ‘गेल्या १२ वर्षांत कोणत्याही सरकाच्या कार्यकाळात शिक्षणाच्या तरतुदीत वाढ होऊ शकलेली नाही. शिक्षणासाठी पावणेदोन टक्के इतकी तरतूद आहे तर, अमेरिकेत साडेतेरा टक्के तरतूद करण्यात येते. त्यामुळेच भारतातील विद्यार्थी अमेरिकेत शिक्षणासाठी जात आहेत. पाच-सहा वर्षांत शिक्षणाच्या तरतुदीची अशीच अवस्था राहिली तर, शिक्षण क्षेत्रात दिर्घकालीन नुकसान होईल,’ असे ते म्हणाले. उपस्थितांच्या अर्थसंकल्पाशी निगडीत प्रश्नोत्तरांनी कार्यक्रमाचा समारोप झाला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 2, 2019 2:57 am

Web Title: girish kuber opinion on the interim budget
Next Stories
1 पालघरमध्ये भूकंपाचा धक्का, स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण
2 बेशिस्त रिक्षा, प्रवाशांना शिक्षा!
3 दुभाजकावर कार धडकून दोघे ठार
Just Now!
X