17 November 2019

News Flash

कल्याणमध्ये तरुणीची हत्या

प्रेम प्रकरणातून हा प्रकार झाला असण्याचा प्राथमिक संशय पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे.

संग्रहित प्रतीकात्मक छायाचित्र

कल्याण: कल्याणमध्ये एका तरुणाने शुक्रवारी संध्याकाळी एका तरुणीवर धारदार शस्त्राने हल्ला केला. जखमी तरुणीला खासगी रुग्णालयात दाखल केले असता तिचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी बाजारपेठ पोलिसांनी तरुणाला अटक केली आहे.

कल्याणमधील रहिवासी सनम करोतिया ही तरुणी आपल्या मित्राला भेटण्यासाठी पत्रीपुलाजवळील कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यालयाबाहेर आली होती. ती आपल्या दुचाकीजवळ मित्राची वाट पाहत उभी असतानाच, दुचाकीवरून दोन तरुण तेथे आले. पाठीमागे बसलेल्या तरुणाने दुचाकीवरून उतरून सनमच्या दिशेने येऊन तिच्यावर चाकूने हल्ला केला आणि घटनास्थळावरून पसार झाला. या हल्ल्यात सनम जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात पडली. पादचाऱ्यांनी तिला खासगी रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला.

बाजार समिती परिसरीतील ‘सीसीटीव्ही’ कॅमेऱ्यांच्या आधारे पोलिसांनी या घटनेचे चित्रीकरण मिळवले. त्या आधारे बाबु ढकली या तरुणाला अटक केली. प्रेम प्रकरणातून हा प्रकार झाला असण्याचा प्राथमिक संशय पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे. बाजारपेठ पोलीस ठाण्यात या गुन्ह्य़ाची नोंद करण्यात आली आहे.

First Published on July 6, 2019 4:25 am

Web Title: girl murder in kalyan zws 70