‘वुई चॅट’ या सोशल नेटवर्किंग साइटवरून (समाज माध्यम) एका तरुणीशी ओळख करून तिच्यावर बलात्कार करणाऱ्या तरुणाविरोधात वालीव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित तरुणी ३० वर्षांची असून सांताक्रूझ येथे राहते. गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात तिची ओळख ‘वुई चॅट’ या सोशल नेटवर्किंगवर एका तरुणाशी झाली. चॅटिंग करून त्याने या तरुणीला आपल्या जाळ्यात ओढले आणि नंतर तिच्याशी बळजबरीने शरीरसंबंध प्रस्थापित केले.
दरम्यान, आरोपीने या तरुणीकडून दोन लाख रुपये घेतले होते. तो ते परत करीत नव्हता. पीडित तरुणीने पैशांची मागणी केल्यावर तिला वसईत एका हॉटेलात बोलावून पुन्हा तिच्यावर बलात्कार केला. तिचे अश्लील छायाचित्रे सगळीकडे प्रसारित करण्याची धमकी देऊन तिला मारहाण केली. या प्रकरणी अखेर तरुणीने सांताक्रूझ पोलीस ठाण्यात तक्रार दिली. हा गुन्हा वसईच्या वालीव पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला असल्याने तिथे तो वर्ग करण्यात आला. या तरुणाविरोधात बलात्कार आणि माहिती-तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल असून बेपत्ता आरोपीचा शोध सुरू आहे.