मुंबईतील सौर ऊर्जा कंपनीला ग्राहक मंचाचा फटका; काम करण्यास दिरंगाई

वसई तालुक्यातील विरार येथील जीवदानी देवी मंदिर ट्रस्टमध्ये सौर उर्जेची यंत्रणा बसवून देण्याचे काम ताडदेव (मुंबई) येथील एका खासगी कंपनीने घेतले होते. या कामाच्या व जुन्या बॅटऱ्या देण्याच्या बदल्यात मंदिर ट्रस्टने खासगी कंपनीला एकूण २ लाख ६० हजार रुपयांची बयाणा (आगाऊ) रक्कम देऊ केली होती. पाच वर्षांपूर्वी काम देऊन व पैसे घेऊनही कंपनीने ते पूर्ण करण्यास दिरंगाई केली म्हणून जीवदानी ट्रस्टने ठाणे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाकडे याप्रकरणी तक्रार केली होती.

मंचाने कंपनीला म्हणणे मांडण्यासाठी नोटिसा पाठविल्या. संबंधित कंपनीने ग्राहक मंचाच्या नोटिसांना कोणताही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे जिल्हा ग्राहक व तक्रार मंचाच्या अध्यक्षा स्नेहा म्हात्रे, सदस्य माधुरी विश्वरूपे, एन. डी. कदम यांनी जीवदानी मंदिर ट्रस्टला कंपनीने सप्टेंबर २०११ पासून दरमहा ९ टक्के व्याजाने २ लाख ६० हजार रुपयांची बयाणा रक्कम व दाव्याच्या खर्चापोटी १० हजार रुपये देण्याचे आदेश दिले.

मंदिराला अशा प्रकारची नुकसानभरपाई देण्याचा मंचाचा हा पहिलाच निर्णय असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येते. विरार येथील जीवदानी देवी मंदिरात सौर ऊर्जेची यंत्रणा बसविली तर मंदिरात नियमित नैसर्गिक प्रक्रियेचे गरम पाणी उपलब्ध होईल. पाणी गरम करण्यासाठी नियमित गॅस, लाकूडफाटा, वीज लागते, त्याची बचत होईल. हा विधायक विचार करून मंदिर ट्रस्टने ऑगस्ट २०११ मध्ये ताडदेव येथील ‘मे. मीनाक्षी पॉवर सेव्हर’ या कंपनीला सौर ऊर्जेची यंत्रणा बसविण्याचे काम दिले. ५ लाख १५ हजार ४११ रुपये खर्चाचे हे काम होते. सप्टेंबर २०११ मध्ये मंदिर समितीने या कामाला व खर्चाला मान्यता दिली. डिसेंबर २०११ पर्यंत हे काम पूर्ण करून देण्याचे आश्वासन मे. मीनाक्षी कंपनीचे मालक अरुण कदम यांनी मंदिर विश्वस्तांना दिले होते.

नोटिसांनाही उत्तर नाही

कामाची आगाऊ बयाणा रक्कम म्हणून २ लाख १० हजार रुपये कदम यांना धनादेशाद्वारे देण्यात आली. तसेच सौर ऊर्जा संवर्धनासाठी ५० हजार रुपये किमतीच्या ३० जुन्या बॅटऱ्या देण्याची मागणी विश्वस्तांनी कदम यांच्याकडे केली. या बॅटऱ्या खरेदीवर एकूण देयकाच्या रकमेत अरुण कदम यांनी ५० हजार रुपयांची सूट देण्याचे आश्वासन विश्वस्तांना दिले. बॅटऱ्या मंदिरात आणून ठेवण्यात आल्या. त्यानंतर अरुण कदम यांनी मंदिराच्या कामाकडे पाठ फिरवली, अशी मंदिर  व्यवस्थापनाची तक्रार आहे. काम केव्हा सुरू कराल, केव्हा पूर्ण होईल अशी विचारणा करणाऱ्या नोटिसा जीवदानी ट्रस्टने कदम यांना पाठविल्या. त्याची समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत, असे व्यवस्थापनाचे म्हणणे आहे.

आपली फसवणूक झाली असल्याचे लक्षात आल्यावर जीवदानी मंदिराचे प्रतिनिधी रामचंद्र गायकवाड यांनी ठाणे जिल्हा ग्राहक व तक्रार निवारण मंचाकडे मे. मीनाक्षी पॉवर सेव्हर विरुद्ध फसवणुकीची तक्रार केली. बयाणा रकमेवर गेल्या पाच वर्षांचे दरमहा २४ टक्के व्याजाने पैसे आणि दाव्याच्या खर्चापोटी १५ हजार रुपये देण्याची मागणी विश्वस्तांनी मंचाकडे केली होती.

कंपनीचा प्रतिसाद नाही..

मंचाने कंपनीला उत्तर देण्यासाठी नोटिसा पाठविल्या. त्याला कंपनीने प्रतिसाद दिला नाही. मंदिर ट्रस्टने मंचापुढे सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये कराराप्रमाणे कंपनीने अटीशर्तीचे उल्लंघन केल्याचे, काम न केल्याचे स्पष्ट दिसत होते. कंपनी आपले म्हणणे मांडण्यास पुढे येत नाही; म्हणून ग्राहक मंचाच्या अध्यक्षा स्नेहा म्हात्रे व सदस्यांनी कंपनीला म्हणणे मांडण्यास पुरेसा अवधी दिला, असे मत व्यक्त करून जीवदानी मंदिराच्या बाजूने एकतर्फी निर्णय दिला आहे. अरुण कदम यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु तो होऊ शकला नाही.