चार राज्यस्तरीय पुरस्काराने पालिकेचा सन्मान

सौर ऊर्जेवरआधारीत पथदिवे, महापालिकेची इमारत, नाटय़गृह, रुग्णालयातील विजेसाठी सौरउर्जेचा पुरेपूर वापर करण्याचा प्रयत्न करणाऱ्या ठाणे महापालिकेला राज्य शासनाच्या वतीने गौरविण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाच्या ऊर्जा विकास अभिकरण संस्थेच्या वतीने या राज्यस्तरीय पुरस्काराचा सन्मान महापालिकेला देण्यात आला. राज्याचे उर्जा तसेच अपारंपारिक उर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते व राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोगाचे अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर यांच्या उपस्थितीत हा गौरव करण्यात आला.

ठाणे पालिकेचे विद्युत विभागाचे उपनगर अभियंता सुनील पोटे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. ठाणे महानगरपालिकेने महापालिका गटात आणि सरकारी इमारत या दोन्ही संवर्गामध्ये राज्यस्तरीय पुरस्कार पटकावले आहेत. ठाणे महानगरपालिकेने पथदिप, महापालिका इमारती, नाटयगृह, हॉस्पिटल आदी ठिकाणी वीज बचत करण्याच्यादृष्टीने विविध उपाय योजना केल्या. सौर ऊर्जेच्या क्षेत्रात  कामगिरी केल्याबद्दल केंद्र शासनाच्या नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाच्यावतीने ‘सौर शहरे’ विकसित करण्याच्या कार्यक्रमांतर्गत ठाणे महापालिकेची निवड केली आहे. त्या अंतर्गत संपूर्ण शहरासाठी ऊर्जा कार्यक्षमता वाढविणे व सौर उर्जेचा जास्तीतजास्त वापर करण्यासाठी विविध प्रकल्प हाती घेण्यात येणार आहेत. पुरस्कारामुळे ठाणे महापालिकेच्या सौर उर्जा क्षेत्रात सुरू असलेल्या कामाला प्रोत्साहन मिळणार असल्याची भूमिका महापालिकेने मांडली आहे.

मुंबई पालिकेच्या इमारतींमध्ये सौर ऊर्जा

महापालिकेच्या मालकीच्या असलेल्या सर्व इमारतींमध्ये सौर उर्जेचा वापर करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. अंधेरी येथील शहाजीराजे क्रिडा संकुलात पालिकेने सौर उर्जेचा वापर पालिकेने केला असून तो प्रयोग यशस्वी झाला आहे. त्यामुळे आता पालिकेच्या मालकीच्या सर्व इमारतींमध्ये सौर उर्जेचा वापर करण्याचे ठरविले आहे.