पोलिसांच्या ‘कर्तव्य मेळाव्यात’ पोलीस उपनिरिक्षक सविता कटके यांची लक्षवेधी कामगिरी

राज्यातील पोलिसांसाठी कर्तव्य मेळाव्याच्या माध्यमातून गुन्ह्य़ांच्या तपासावर आधारित विविध विषयांवर नुकत्याच घेण्यात आलेल्या परीक्षांमध्ये ठाणे पोलीस दलातील महिला पोलीस उपनिरीक्षक सविता कटके यांनी दोन सुवर्णपदक पटकाविले आहेत. या कामगिरीमुळे आता त्यांची राज्यातील संघामधून देश पातळीवरील अशाच स्पर्धेसाठी निवड होण्याची शक्यता आहे. तसेच या कामगिरीमुळे संपूर्ण आयुक्तालयात त्यांचे कौतुक होत असून ठाणे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी तिला दहा हजार रुपयांचे बक्षीस दिले आहे.

अत्याधुनिक आयुधांचा वापर करून तपासाची कौशल्य व कार्यक्षमता वाढवी म्हणून राज्यातील पोलिसांसाठी ‘कर्तव्य मेळाव्या’चे आयोजन करण्यात येते. त्यामध्ये  या परीक्षेसाठी राज्यातील विविध आयुक्तालय तसेच ग्रामीण अधीक्षक क्षेत्रातील पोलीस अधिकाऱ्यांचे संघ भाग घेतात. यंदा पुणे जिल्ह्य़ातील रामटेकडी येथील राज्य राखीव दल क्रमांक गट एक येथे राज्यस्तरीय कर्तव्य मेळावा आयोजित करण्यात आला होता. १८ ते २३ जुलै या कालावधीत हा मेळावा पार पडला असून त्यात राज्यातील विविध आयुक्तालय तसेच ग्रामीण क्षेत्रातील पोलिसांचे एकूण २१ संघ सहभागी झाले होते. या संघामध्ये पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षक या दर्जाचे ६३ अधिकाऱ्यांचा समावेश होता. त्यामध्ये ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रातील १६ अधिकारी होते. बॉम्ब शोधक-नाशक पथक, संगणक विभाग तसेच अन्य विभागातील हे अधिकारी होते. राज्यस्तरीय कर्तव्य मेळाव्यात सहभागी झालेल्या ६३ अधिकाऱ्यांनी गुन्ह्य़ाच्या तपासावर आधारित विविध विषयांवर परीक्षा दिल्या. त्यामध्ये ‘लिफ्टिंग पॅकिंग अ‍ॅण्ड लेबलिंग प्रॅक्टिकल’ आणि ‘फिंगर प्रिन्ट प्रॅक्टिकल अ‍ॅण्ड ओरल’ या दोन विषयांत ठाणे पोलीस दलातील महिला पोलिस उपनिरीक्षक सविता कटके यांनी दोन सुवर्णपदक पटकाविले आहेत.

काय आहे ‘कर्तव्यमेळावा’

कर्तव्यमेळाव्यात गुन्ह्य़ांच्या तपासावर आधारित विविध विषयांवर लेखी तसेच तोंडी परीक्षा घेण्यात येते. त्यामध्ये गुन्ह्य़ांच्या तपासाची शास्त्रीय पद्धत, जप्त केलेल्या ऐवजाची पॉकिंग व लेबलिंग, हाताचे ठसे कसे घ्यावेत, श्वानांची क्षमता तपासणी, घातपातविरोधी तपासणीचे प्रशिक्षण, घटनास्थळाची प्राथमिक माहिती छायाचित्रण कसे घ्यावे, अशा विषयांचा समावेश असतो.