tvlog06धुवाधार बरसणारा पाऊस, वाफाळता चहा आणि मित्र-मैत्रिणींची जमलेली मैफल असं वातावरण असेल तर कुठली गाणी ऐकावीशी वाटतील?
मन नक्कीच ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाइटच्या नॉस्टेल्जियात रमण्याचा कौल देईल! चांगल्या कानसेनांची सोबत असेल तर आणखी बहार येते! अशीच बहार रसिकांना नियमितपणे अनुभवायला मिळावी, विशेषत्वाने हिंदीतली जुनी गाणी रसिकांपर्यंत पोहोचावीत यासाठी अंबरनाथचे प्रशांत कर्वे, इनायत खां आणि धनंजय देशपांडे हे तिघे जण सातत्याने प्रयत्न  करताहेत. आत्तापर्यंत ‘कानसेन’मधून रेकॉर्डसचा वैयक्तिक संग्रह असणाऱ्या संग्राहकांचा परिचय करून दिला होता, आज मात्र जुन्या गाण्यांचं जतन सांघिक पातळीवर करणाऱ्या सुवर्ण अंबर संगीत संघाविषयी जाणून घेऊ या.
‘सुवर्ण अंबर संगीत संघा’ची स्थापना १९ मार्च १९९७ ला गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर केली गेली. महिन्यातून किमान एक तरी श्रवणसत्र करायचं, ते १९३१ ते १९८१ या दरम्यानच्या – शक्यतो हिंदी गीतांचं करायचं, गायक-गीतकार-संगीतकार यांच्या संबंधीचं हे सत्र विनामूल्य ठेवायचं असे काही या संघाचे नियम आहेत. या संघाने एक चतु:सूत्री ठरवली आहे आणि आज तीच या संघाचं वैशिष्टय़ बनली आहे. ती चतु:सूत्री म्हणजे एक तर गाणं दुर्मीळ असावं, दुसरं म्हणजे ते शक्यतो शास्त्रीय संगीतावर आधारित असावं, विविध प्रकारच्या वाद्यांचा त्यात वापर असावा आणि शेवटचं म्हणजे ते ऐकण्यासाठी सुस्पष्ट, सुखद आणि स्वच्छ – निर्दोष असावं अशी ही चतु:सूत्री आहे. अनेक दुर्मीळ गाणी जी कदाचित इंटरनेटवर सहज उपलब्ध नाहीत, काही खास संग्राहकांच्या वैयक्तिक संग्रहातच आहेत अशी गाणीही या कार्यक्रमांच्या निमित्ताने सर्वसामान्य रसिकांना ऐकायला मिळतात हे या श्रवणसत्रांचं वैशिष्टय़ आहे. सुरुवातीला या संघाने वर्षांला बारा कार्यक्रम केले आणि त्यात वेगवेगळ्या गायकांच्या गायकीच्या छटा, पाऊसगीतं, चंद्रगीतं, गैरफिल्मी गीतं, गजल, यमन रागावर आधारित गीतं असे एखाद्या संकल्पनेवर आधारित कार्यक्रम होते.
हेमंत कुमार, तलत मेहमूद, लताजी -आशाजी, मुकेश, सी. रामचंद्र, रोशन, मदन मोहन, दादा बर्मन, अनिल विश्वास, मोहम्मद रफी, गुलाम मोहम्मद, सज्जाद  हुसैन, मास्टर इब्राहिम अशा अनेक कलाकारांवर आत्तापर्यंत श्रवणसत्रं झाली आहेत. कवी-गीतकार केशव त्रिवेदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या खास त्यांच्या गाण्यांच्या कार्यक्रमात त्यांची स्वत:ची उपस्थिती आणि रेडिओ सिलोनचे सुप्रसिद्ध निवेदक गोपाल शर्मा यांचे निवेदन असा सुवर्णयोग जुळून आला होता! त्या वेळी ऐकवलं गेलेलं एक दुर्मीळ गाणं तर रेडिओ सिलोनच्याही संग्रहात नाही असं त्यांनी सांगितलं होतं. अत्यंत दुर्मीळ गाणी ऐकवण्याच्या या संघाच्या कामाची जणू ती पावतीच होती. उदयोन्मुख सतारीया शेखर राजे यांचा जलसा आणि गजलनवाझ वजाहत हुसैन खां यांच्याबद्दलच्या कार्यक्रमाची मुंबई दूरदर्शननेही दखल घेतली होती. एक कार्यक्रम महान संगीतकार गुलाम मोहम्मद यांच्या मुला-नातवंडांच्या उपस्थितीत झाला तर आणखी एका कार्यक्रमाला प्रसिद्ध संगीतकार आणि मेंडोलीनसम्राट सज्जाद हुसैन यांच्या ज्येष्ठ चिरंजीवांची उपस्थिती होती. कार्यक्रमांसाठी कर्वे, खां आणि देशपांडे यांच्या वैयक्तिक रेकॉर्डस संग्रहातली गाणी घेतली जातात. फक्त ती गाणी थेट रेकॉर्डसवरून ऐकवणं तितकं सोपं होत नसल्यामुळे प्रत्येक कार्यक्रमाची डीव्हीडी तयार केली जाते. हे तांत्रिक काम इनायत खां करतात.
सुवर्ण अंबर संगीत संघाने आत्तापर्यंत अनेक कार्यक्रम केले आहेत आणि या पुढेही अनेक उपक्रम त्यांना राबवायचे आहेत. तलत मेहमूद फॅन क्लबची स्थापना करणं, सगळ्या प्रकारच्या संगीताशी संबंधित पुस्तकं, स्पूल्स, रेकॉर्डस, कॅसेट्स, सीडीज, डीव्हीडीज, पोस्टर्स वगैरे सगळं एकत्रित मिळेल अशा संग्रहालयाची स्थापना करणं, वेगवेगळ्या वयोगटांनुसार आवाजाची कार्यशाळा आयोजित करून नवीन, ताज्या दमाच्या आवाजांचा शोध घेणं अशी काही प्रमुख उद्दिष्टं या संघापुढे आहेत. कार्यक्रमांच्या बाबतीतल्या आगामी योजना सांगायच्या झाल्या तर बाबूजी अर्थात सुधीर फडके यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ऑगस्ट महिन्यात दोन कार्यक्रम – एक दृक्श्राव्य तर दुसरा श्राव्य हे बाबूजींच्या गाण्यांविषयी असतील.     सुवर्ण अंबर संगीत संघाची स्थापना जरी प्रशांत कर्वे, इनायत खां आणि धनंजय देशपांडे यांनी केली असली तरी या संघाचे कार्यक्रम इतकी र्वष सातत्याने सुरू राहण्यात प्रकाश काणे, विजयमोहन भाटिया, विश्वनाथ सोनावणे, कामत, देशवंडीकर, गांगल, डॉ. अहुजा, गंधे, अविनाश कुलकर्णी, विनायक पटवे, इसाक शेख, डॉ. बाडगी अशा अनेकांचं मोलाचं सहकार्य आहे. सुवर्ण अंबर संगीत संघाचं कार्य असंच सुरू राहो!
अधिक माहितीसाठी संपर्क : प्रशांत कर्वे झ्र् ९७६९१३५९७१