News Flash

चर्चेतील चर्च : वसई किल्ल्यातील रत्न!

वसईचा किल्ला म्हणजे वसई शहराच्या गळ्यातील रत्नजडित हार. या हारामध्ये अनेक रत्ने ओवलेली आहेत,

गोन्सालो गार्सिया चर्च

ऐतिहासिक वसई किल्ल्यामध्ये १५६४मध्ये गोन्सालो गार्सिया चर्च उभारण्यात आले. तब्बल साडेचारशे वष्रे पुरातन असलेले हे चर्च म्हणजे वसई किल्ल्यातील रत्नच! जानेवारी महिन्याच्या दुसऱ्या रविवारी या चर्चला उत्सवाचे स्वरूप येते.

वसईचा  किल्ला म्हणजे वसई शहराच्या गळ्यातील रत्नजडित हार. या हारामध्ये अनेक रत्ने ओवलेली आहेत, त्यापैकी एक रत्न म्हणजे ‘संत गोन्सालो गार्सिया चर्च’. सुमारे साडेचारशे वर्षांपूर्वी बांधलेल्या चर्चमध्ये त्याच्या पुरातत्त्वाच्या खुणा जागोजागी आढळतात.

या चर्चला मोठा इतिहास आहे. संत फ्रान्सिस झेवियर याने ६ मे १५४२ रोजी गोव्याच्या किनाऱ्यावर पाऊल ठेवले. त्यानंतर त्यांनी दोन ते तीन वेळा वसईला भेटी दिल्या. त्यांच्या दुसऱ्या भेटीमध्ये ते प्रत्यक्ष तेथील गव्हर्नरला भेटले आणि त्यांनी चर्चसाठी जमिनीची मागणी केली. गव्हर्नरने त्याला अनुमोदन दिले आणि १५४९ मध्ये तिथे जेजुईट्स धर्मगुरूंचे एक झावळ्यांचे छोटेखानी चर्च उभे राहिले. त्याचे नाव ‘होली नेम ऑफ जीजस’. ते चर्च लोकांना पुरेसे नव्हते, म्हणून १५६४ मध्ये सध्या अस्तित्वात असलेले मोठे चर्च फादर मिल्खिऑर घोंसलीविस यांच्या नेतृत्वाखाली आकार घेऊ  लागले आणि व त्याला जोडूनच एक शिक्षण संस्था उभी राहिली.

जेजुईट्स संघाचे धर्मगुरू हे शिक्षणात अग्रेसर. खुद्द फादर फ्रान्सिस झेवियर हे पॅरिसमधील महाविद्यालयाचे नामांकित प्राध्यापक. त्यांच्या सहकाऱ्यांबरोबर जेजुईट्स धर्मगुरूंनी वसई किल्ल्यात एक मोठी शिक्षण संस्था स्थापन केली. त्या संस्थेत शेकडो विद्यार्थी शिकले. त्यातील एक अग्रणी पुढे संतपदाला पोहोचले. त्यांचे नाव संत गोन्सालो गार्सिया.

संत गोन्सालो गार्सिया हे जेजुईट्स धर्मगुरूंचे शिष्य. बालवयातच ते त्यांच्यासोबत पूर्वेकडच्या देशाला निघाला. अनेक देशांचा प्रवास झाल्यानंतर ते जपानला पोहोचले. काही कारणास्तव गोन्सालो गार्सिया यांना जेजुईट्स धर्मगुरूंबरोबर शिक्षण घेता आले नाही. म्हणून ते फ्रान्सिस्कन संघात शिरले आणि त्या संघात धर्मगुरू न होता ब्रदर राहिले.

वसई किल्ल्यात एकूण सात चर्च आहेत. त्यापैकी लोकांच्या अतिपरिचयाचे म्हणजे संत गोन्सालो गार्सिया चर्च. संत गोन्सालो गार्सिया यांना १५९७ मध्ये नागासाकी येथे क्रुसावर चढवण्यात आले. रोम दरबारी त्यांना संत ही उपाधी मिळाली. या संतांच्या जन्माच्या चतुर्थ शताब्दीनिमित्त वसई किल्ल्यात एक बहारदार सोहळा संपन्न झाला. त्या सोहळ्याच्या दिवसापासून या चर्चचे ‘होली नेम ऑफ जीजस’ हे नाव मागे पडून त्याला संत गोन्सालो गार्सिया हे नवे नाव प्राप्त झाले. दरवर्षी नाताळच्या सणानंतर वसई किल्ल्यात मोठा सोहळा होतो. या सोहळ्यातील सर्व कार्यक्रम या चर्चच्या प्रांगणाात होतात.

वसई किल्ल्यातील सर्व चर्च उपासनेसाठी वापरली जात नाहीत. पुरातत्त्व विभागाच्या अधिपत्याखाली सर्व चर्च आहेत. गोन्सालो गार्सिया हे चर्चही याच खात्याच्या देखरेखीखाली असले तरी ते उपासनेसाठी वापरले जाते. दिल्लीहून त्यासंदर्भात आलेला दस्तावेज कॅथलिक चर्चच्या धार्मिक अधिकाऱ्यांकडे उपलब्ध आहे.

उत्सवाचे आयोजन

जानेवारी महिन्याच्या दुसऱ्या रविवारी या चर्चची जत्रा भरते. पंचक्रोशीतील शेकडो भाविक या जत्रेत सहभागी होतात. वर्षभर सुनसान असलेल्या या चर्चला यामुळे एक प्रकारचा जिवंतपणा येतो. हा सोहळा सलग तीन दिवस चालतो. सणाच्या आदल्या दिवशी कोळीवाडय़ातील मध्यवर्ती ठिकाणाहून ख्रिस्ती व हिंदू बांधवांची एक भव्य मिरवणूक निघते. हिंदू बांधव आपल्या घरासमोर रांगोळ्या घालतात आणि सर्व सुहासिनी मिरवणुकीत सहभागी होतात.

ख्रिस्त पुराणाची निर्मिती

आनंदाची गोष्ट म्हणजे आज मराठी साहित्याला ललामभूत ठरलेले ‘ख्रिस्त पुराण’ या महाकाव्याची अंतिम जडणघडण फादर थॉमस स्टिफन्स यांनी १६१२ मध्ये या किल्ल्यात केली. मराठी भाषेतील प्रकाशित झालेल्या या महाकाव्याचा वसईकरांना अभिमान आहे. या चर्चमध्ये धर्मगुरू नेमलेले नाहीत. चर्चची सर्व देखभाल ‘संत पीटर चर्च कोळीवाडा’ यांच्यातर्फे  केली जाते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 3, 2017 3:06 am

Web Title: gonsalo garcia church vasai
Next Stories
1 वसई किल्ल्यात संध्याकाळी ६नंतर प्रवेश बंद
2 वसाहतीचे ठाणे : शेजारस्नेह जपलेले टुमदार संकुल
3 शहरबात- कल्याण : शिळफाटा रस्त्यावरील लंगडी कारवाई
Just Now!
X