जयवंत चुनेकरांना मराठी भाषेची खरी आस्था होती. म्हणूनच त्यांनी भाषेच्या संवर्धनासाठी माय मराठीसारख्या ग्रंथासाठी मोलाचे संशोधन केले, असे मत ग्रंथाली या पुस्तक प्रकाशन संस्थेचे संचालक सुदेश हिंगलासपूरकर यांनी व्यक्त केले. ग्रंथसखा वाचनालय व व्यास क्रिएशन्सच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या या कार्यक्रमात मराठी भाषेचे अभ्यासक जयवंत चुनेकर यांच्या ‘निवडक चुनेकर’ या पुस्तकाच्या पहिल्या भागाच्या प्रकाशन करण्यात आले.
दादरहून बदलापुरात स्थायिक झालेल्या कै. जयवंत चुनेकर यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त १५ ऑगस्टला हा कार्यक्रम पाटील मंगल कार्यालय येथे झाला. यावेळी हिंगलासपूरकर पुढे म्हणाले, गेली ३५ वर्षे चुनेकरांशी माझा स्नेह होता. मराठी भाषेची आस्था असणारे चुनेकर यांच्याशी अनेक विषयांवर चर्चा होत असे. ग्रंथालीची संकल्पना असलेल्या पाच खंडांच्या संकल्पना कोशांचे संपादन करण्याची वेळ आली तेव्हा या खंडांच्या संपादनाचे शिवधनुष्य माझ्या विनंतीवरून चुनेकर यांनी लीलया पेलले. त्यानंतरही त्यांनी अनेक पुस्तकांच्या संपादनात मला मदत केली. त्यांच्या पुस्तकाचे संपादन व प्रकाशन केल्याने त्यांचे वाड्मयीन श्राद्ध केल्यासारखेच आहे, अशी भावना लेखक रविप्रकाश कुलकर्णी यांनी या वेळी व्यक्त केली.