News Flash

पालिकेला आर्थिक दिलासा

करोना काळात ३२२ कोटींच्या मालमत्ता कराची वसुली; दोन महिन्यांत ८१ कोटी वसूल

महापालिका क्षेत्रामध्ये करोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्याबरोबरच महापालिकेची विस्कटलेली आर्थिक घडी रुळावर आणण्यासाठी प्रशासनाने गेल्या काही महिन्यांपासून प्रयत्न सुरू केले आहेत.

लोकसत्ता खास प्रतिनिधी

ठाणे : महापालिका क्षेत्रामध्ये करोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्याबरोबरच महापालिकेची विस्कटलेली आर्थिक घडी रुळावर आणण्यासाठी प्रशासनाने गेल्या काही महिन्यांपासून प्रयत्न सुरू केले आहेत. त्यातूनच महापालिका प्रशासनाने आतापर्यंत ३२२ कोटी रुपयांच्या मालमत्ता कराची वसुली केली असून गेल्या दोन महिन्यांत ८१ कोटींची वसुली झाली आहे. महापालिकेच्या तिजोरीत कराच्या रूपाने मोठा महसूल जमा झाल्याने करोना काळात महापालिकेला काहीसा आर्थिक दिलासा मिळाल्याचे चित्र आहे.

ठाणे महापालिकेच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत मालमत्ता कर मानला जातो. यंदा या करापोटी ६९० कोटी रुपयांचे उत्पन्न अपेक्षित धरण्यात आले  आहे. मात्र, आर्थिक वर्षांपासूनच म्हणजेच एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासूनच शहरात करोनाचा प्रादुर्भाव वाढला. हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वच बाजारपेठा, दुकाने आणि वाहतूक बंद करण्यात आली होती. यामुळे शहराचे अर्थचक्र थांबले होते. त्याचा परिणाम महापालिकेचा मालमत्ता करासह अन्य कर वसुलीवर झाला. या काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या तर काहींची पगारकपात झाली. तसेच दुकाने आणि उद्योगधंदेही बंद होते. त्यामुळे महापालिकेच्या तिजोरीत मालमत्ता कर जमा होईल की नाही, याबाबत साशंकता होती. असे असतानाच जुलै महिन्यात टाळेबंदी शिथिल करण्यास सुरुवात झाली आणि त्यानंतर शहरातील बाजारपेठांसह दुकाने सुरू झाली. त्यानंतर महापालिका प्रशासनानेही जून महिन्याच्या अखेरीपासून मालमत्ता करवसुलीवर विशेष भर दिला. करोना काळात उभारण्यात आलेल्या रुग्णालयांमध्ये रुग्णांना आरोग्य सेवा पुरविण्यासाठी तसेच करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरात मोठा निधी खर्च करावा लागत होता. मात्र, कराचा पैसा जमा होत नसल्यामुळे महापालिकेपुढेही आर्थिक संकट उभे राहिले होते. त्यामुळे करोना काळात महापालिकेच्या तिजोरीत मालमत्ता कराचा भरणा करणे किती आवश्यक आहे, याबाबत प्रशासनाने जनजागृती करून कर वसुली केली. या करवसुलीसाठी १६ जुलैपासून महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे यांच्या आधिपत्याखाली विशेष प्रयत्न सुरू करण्यात आले होते. त्याचे सकारात्मक परिणाम महिनाभरातच दिसून आले. तसेच महापालिकेच्या तिजोरीत सप्टेंबर महिनाअखेपर्यंत २४१ कोटींचा मालमत्ता कर

जमा झाला होता. त्यामध्ये गेल्या दोन महिन्यांत ८१ कोटी रुपयांची वाढ झाली असून आता पालिकेच्या तिजोरीत एकूण ३२२ कोटी २५ लाख रुपयांचा कर जमा झाला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 28, 2020 3:15 am

Web Title: good property tax collection by thane municipal corporation in corona time dd70
Next Stories
1 फळांच्या दरात १० ते ४० रुपयांची वाढ
2 कोंडी फोडण्यासाठी पोलीस सज्ज
3 पलावा उड्डाणपुलाच्या आराखडय़ास मंजुरी
Just Now!
X