मुरबाडजवळील फांगणे गावातील प्रत्येक घरात ‘रेनवॉटर हार्वेस्टिंग’

वयाची साठी ओलांडलेल्या वृद्ध महिलांना एकत्र आणून साक्षरतेचे धडे गिरवण्याचा उपक्रम राबवल्याबद्दल कौतुकास पात्र ठरलेल्या फांगणे गावाने आता पर्जन्य जलसंधारणाच्या बाबतही नवीन आदर्श निर्माण केला आहे. पावसाचे पाणी अडवून, साठवून दुय्यम कामांसाठी त्याचा वापर करण्याची ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ योजना शहरात संपूर्ण साधने असतानाही राबवली जात नसताना या गावाने पर्जन्य जलसंधारण योजनेची अंमलबजावणी करण्याचा निर्धार केला आहे. गावातील सर्व घरांमध्ये अशी व्यवस्था बसवण्यात आली असून त्याद्वारे पावसाच्या पाण्याचा सुयोग्य वापर करणे शक्य होणार आहे.

मुरबाडपासून काही किलोमीटरवर असलेले फांगणे गाव आपल्या विविध समाजोपयोगी उपक्रमांमुळे गेल्या काही वर्षांत प्रकाशझोतात आले आहे. आता या गावाने पर्जन्य जलसंधारण प्रकल्प हाती घेतला आहे. यासाठी अंबरनाथच्या कै. मोतीराम गणपतदादा चॅरिटेबल ट्रस्टने यासाठी निम्मे अर्थसाहाय्य केले, तर उर्वरित खर्च ग्रामस्थांनी केला. सध्या गावातील ७० घरांपैकी ६५ घरांमध्ये हा प्रकल्प पूर्ण करण्यात आला असून येत्या काही दिवसांत सर्वच घरांमध्ये हा प्रकल्प पूर्णत्वास नेला जाणार आहे. घराच्या कौलांवरून पडणारे पाणी पाइपच्या मदतीने जमिनीत मुरवले जात असून, यामुळे गावातील जमिनीतील पाण्याची पातळी वाढण्यास मदत होणार आहे.

गेल्या वर्षी फांगणे गावालाही दुष्काळाच्या झळा बसल्या. दोन-दोन किलोमीटरवरून ग्रामस्थांना पाणी आणावे लागत होते. त्यामुळे भविष्यात अशी समस्या भेडसावू नये, यासाठी ग्रामस्थांनीच पुढाकार घेतला. सध्या गावात तीन कूपनलिका आणि दोन विहिरी आहेत. या प्रकल्पामुळे गावातील पाण्याची पातळी वाढल्यास येत्या उन्हाळ्यात नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार नाही, असा आशावाद येथील शिक्षक योगेंद्र बांगर यांनी व्यक्त केला.