मुंबई महापालिकेकडून पाच दशलक्ष लिटर पाणी मिळणार

ठाणे महापालिका हद्दीतील वागळे इस्टेट आणि ठाणे शहर भागात निर्माण झालेल्या पाणीटंचाईवर तोडगा शोधण्यात अखेर प्रशासनाला यश आले असून मुंबई महापालिकेने पाच दशलक्ष लिटर वाढीव पाणी या भागांसाठी पुरविण्याचे मान्य केले आहे.

उन्हाळ्यातील पाण्याचे नियोजन करताना पाटबंधारे विभागाने जिल्हय़ातील स्थानिक स्वराज्य संस्थांना आठवडय़ातून एक दिवस पाणी बंद करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे एमआयडीसी, स्टेम यांसारख्या प्राधिकरणांनाही पाण्याचा कमी पुरवठा होत असून यामुळे ठाणे शहर आणि वागळे इस्टेट परिसरातील अनेक वस्त्यांमध्ये पाणीटंचाई सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.

सद्य:स्थितीत ठाणे महापालिकेस विविध स्रोतांमधून दिवसाला ४८० दशलक्ष लिटर इतका पाण्याचा पुरवठा होत असतो. हा पाणी पुरवठा ठाणे महापालिकेच्या स्वत:ची पाणीपुरवठा योजना, स्टेम, एमआयडीसी तसेच मुंबई महापालिकेमार्फत करण्यात येतो. उन्हाळ्यातील पाण्याचे नियोजन करण्यासाठी पाटबंधारे विभागाने जिल्हय़ातील वेगवेगळ्या धरणांतून पाणी उपशावर काही प्रमाणात र्निबध घातले आहेत. तसेच जिल्हय़ातील सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांना आठवडय़ातून एक दिवस पाणीपुरवठा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या नव्या वेळापत्रकामुळे स्टेम आणि एमआयडीसी यांच्या पाणीपुरवठय़ात कपात झाल्याने त्याचा फटका ठाणे शहराला बसू लागला आहे. गेल्या काही दिवसांपासून ठाणे शहर तसेच वागळे इस्टेट भागात पाणीटंचाई सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.

वागळे इस्टेट परिसरात अनेक भागांमध्ये वेळेवर पाणीपुरवठा होत नसल्याच्या तक्रारी असून काही भागांत अतिशय कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. पालकमंत्री एकनाथ िशदे यांच्या मतदारसंघात ही परिस्थिती असल्याने यासंबंधी तीव्र प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली होती. या पाश्र्वभूमीवर महापालिका प्रशासनाने गेल्या काही दिवसांपासून अतिरिक्त पाणी मिळावे यासाठी मुंबई महापालिकेकडे पाठपुरावा सुरू केला होता. त्यास यश मिळाले असून ठाणे महापालिकेस पाच दक्षलक्ष लिटर अतिरिक्त पाण्याचा पुरवठा करण्यास मुंबई महापालिकेने तयारी दाखवली आहे. यासंबंधीचे काम पूर्ण झाले असून हा अतिरिक्त पाणीपुरवठा टेकडी जलकुंभात सुरू करण्यात आला आहे, अशी माहिती जनसंपर्क अधिकारी संदीप माळवी यांनी दिली.