अंबरनाथ स्थानकातील फलाट क्रमांक तीनवर रविवारी दुपारी लोकल ट्रेन येत असताना या ट्रेनखाली येणाऱ्या पाच वर्षीय मुलाला वाचविणाऱ्या व्यक्तीचा शोध लागला असून, आपल्या जिवाची पर्वा न करता क्षणात त्या मुलाला सुखरूप रुळावरून बाहेर काढण्याचे धाडस करणाऱ्या या व्यक्तीचे नाव गोपाळ चव्हाण आहे.
बदलापुरात एका बिस्कीट कंपनीच्या सेल्समनचे काम करणारे गोपाळ चव्हाण यांनीच रविवारी रेल्वेखाली जाणाऱ्या एका चिमुकल्याचा जीव वाचविला. या अपघाताचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये बंदिस्त झाला होता. हे दृश्य बाहेर पडताच या देवदूताचा शोध सर्वच जण घेत होते, मात्र गेले दोन दिवस पडद्याआड असणारे चव्हाण हे मंगळवारी सायंकाळी सर्वासमोर आले. रविवारी चव्हाण हे आपल्या कामानिमित्त अंबरनाथमध्ये आले होते. अंबरनाथचे काम आटोपल्यावर ते उल्हासनगरला जाण्यासाठी स्टेशनवर आले. गाडी पकडण्याच्या तयारीत असताना त्यांना समोर फलाट क्रमांक दोनवरून एक पाच वर्षांचा मुलगा फलाट क्रमांक तीनच्या दिशेने येताना दिसला. या मुलाला रोखण्याचा प्रयत्न सर्वानीच केला, मात्र हा मुलगा थेट फलाट क्रमांक तीनच्या रुळावर येऊन फलाट चढण्याचा प्रयत्न करू लागला. चव्हाण यांनी लगेचच मुलाला पूर्ण जोर लावून वर ओढले.