कुख्यात गुंड दाऊद हा पाकिस्तानात लपून बसल्याचे पुरावे न्यायालयाकडे आहेत. त्यामुळे दाऊदला भारतात आणण्याचे सरकारचे प्रयत्न सुरू असल्याचे सीबीआयचे विशेष सरकारी वकील अ‍ॅड. दीपक साळवी यांनी सांगितले. शनिवारी नौपाडा येथील मराठी ग्रंथ संग्रहालय येथे ‘विचार व्यासपीठ’तर्फे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.

मुंबई बॉम्बस्फोट खटल्यामागच्या घटना जाणून घेण्यासाठी अ‍ॅड. दीपक साळवी यांची मुलाखत ‘विचार व्यासपीठ’चे अभय मराठे आणि मकरंद मुळे यांनी घेतली. मुंबईमध्ये १९९३ ला झालेल्या बॉम्बस्फोटाचा दाऊद हा मुख्य सूत्रधार असून तो आयएसआय या पाकिस्तानच्या गुप्तहेर यंत्रणेच्या साहाय्याने पाकिस्तानात लपून बसल्याचे पुरावेदेखील उपलब्ध आहेत.

ज्या वेळी हा खटला माझ्याकडे आला त्या वेळी आरोपींविरोधात फार कमी पुरावे होते. खटल्याची लाखभर पाने वाचल्यानंतरही हाती काहीच लागत नव्हते.  मी सुमारे ४५० साक्षीदारांची चौकशी केली आणि त्यातूनच सात आरोपींना शिक्षा करणे शक्य झाल्याचे साळवी यांनी सांगितले.

या खटल्यात प्रसारमाध्यमांनीही महत्त्वाची भूमिका बजावली होती असेही त्यांनी सांगितले.

खटला लढविताना अनेक प्रलोभने आली. मात्र, आयुष्यात चांगले गुरू आले. त्यांनी मला प्रामाणिकपणे लढण्यास सांगितले. त्यामुळे या प्रलोभनाला कधी बळी पडलो नाही आणि पडणारही नाही असेही ते म्हणाले.