23 October 2020

News Flash

बारवी धरणग्रस्त महिनाभरात शासकीय नोकरीत

२०९ जणांना नियुक्तीपत्रे मिळणार

२०९ जणांना नियुक्तीपत्रे मिळणार

बदलापूर: जिल्ह्याची तहान भागवण्यासाठी आपल्या शेती, रोजगार आणि घरांसह विस्थापित झालेल्या बारवी धरणग्रस्तांच्या रोजगाराचा प्रश्न अखेर निकाली लागला आहे. धरणग्रस्तांपैकी २०९ उमेदवारांना लवकरच नियुक्तीपत्रे दिली जाणार असून ऑक्टोबर महिन्यात ते महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या शासकीय सेवेत रुजू होणार आहेत.

बारवी धरणाच्या विस्तारीकरणामुळे धरणात अतिरिक्त १०६ दशलक्ष घनलिटर पाण्याची भर पडली आहे. त्याचा ठाणे जिल्ह्यातील जवळपास सर्वच महापालिका, नगरपालिका आणि ग्रामीण भागाला फायदा होणार आहे. मात्र अतिरिक्त पाण्यासाठी बारवी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील अनेक आदिवासी बांधवांना विस्थापित व्हावे लागले. त्यांना प्रति घर एक नोकरी देण्याचे आश्वासन दशकभरापूर्वी  महामंडळाने दिले होते.  एकूण एक हजार २०३ कु टुंबातील प्रत्येकाला नोकरी दिली जाणार होती. प्रकल्पग्रस्त आणि एमआयडीसी यांच्यातील असमन्वयामुळे २०१९ पर्यंत उंची वाढवूनही धरणात पाणीसाठा करता येत नव्हता. त्यासाठी स्थानिक आमदार किसन कथोरे यांच्या माध्यमातून एमआयडीसी अधिकाऱ्यांनी प्रत्येक गावात बैठका घेत प्रकल्पग्रस्तांना विश्वासात घेतले होते.   गेल्या वर्षांत धरणग्रस्तांच्या नोकरीसाठी मीरा-भाईंदर येथे परीक्षा आयोजित करण्यात आली होती. पहिल्या टप्प्यात नोकरी देण्यात एमआयडीसीने पुढाकार घेतला आहे. एमआयडीसी एकूण पाण्याचा २७ टक्के वाटा घेणार असल्याने त्या प्रमाणात ३२९ जणांना एमआयडीसीतर्फे प्रशासनात नोकरी स्वरूपात सामावून घेतले जाणार आहे. त्यातील २०९ पात्र उमेदवारांची प्रक्रिया टाळेबंदीच्या काळात रखडली होती. ती प्रक्रिया पूर्ण करण्यात एमआयडीसीला यश आले असून २०९ उमेदवारांना येत्या महिनाभरात रुजू करून घेतले जाणार असल्याची माहिती एमआयडीसी सूत्रांनी दिली आहे. लवकरच उद्योगमंत्र्यांच्या हस्ते या उमेदवारांना नियुक्तीपत्राचे वाटप केले जाणार असून एमआयडीसीच्या विविध कार्यालयात त्यांना रुजू करून घेतले जाणार आहे. तशा सूचनाही या उमेदवारांना देण्यात आल्या आहेत.

गेल्या तीन वर्षांपासून आम्ही नोकरीची वाट पाहत होतो. अखेर ते स्वप्न साकार होणार आहे. एमआयडीसीमध्ये कनिष्ठ अभियंता म्हणून रुजू होत असल्याचा आनंदही आहे आणि जबाबदारीची जाणीवही आहे.

– जोत्स्ना पवार, कनिष्ठ अभियंता, बारवी धरणग्रस्त.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 30, 2020 2:49 am

Web Title: government job for barvi dam victim during the month zws 70
Next Stories
1 मीरा-भाईंदरमधील रहिवाशांचा घरे रिकामी करण्यास नकार
2 आरोग्य विभागातील ४०१ जणांना करोनाबाधा
3 परिवहनचा तिढा पोलीस प्रशासनाच्या दारी
Just Now!
X