News Flash

सहकार भवनचा प्रस्ताव धूळ खात

पालघर जिल्ह्य़ातील सहकाराला वसईतून खऱ्या अर्थाने सुरुवात झाली.

१० वर्षांपासून प्रतीक्षा; सरकारी जागाच उपलब्ध नाही

मिल्टन सौदिया, वसई

पालघर जिल्ह्य़ात सहकाराचा पाया रोवणाऱ्या वसईत सहकार भवन उभारण्यात यावे यासाठी १० वर्षांपूवी प्रस्ताव आणण्यात आला होता. मात्र त्यासाठी सरकारी जागाच उपलब्ध होत नसल्याने हा प्रस्ताव धूळ खात पडला आहे. माजी नगरसेविका जोस्पीन फरगोज यांनी याकडे शासनाचे लक्ष वेधले आहे.

पालघर जिल्ह्य़ातील सहकाराला वसईतून खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. सन १९०८ साली म्हणजे सहकार कायदा येण्याच्या आधीच एका कॅथॉलिक धर्मगुरूने बॅसीन कॅथॉलिक क्रेडिट सोसायटी स्थापन केली. त्याचे रूपांतर बँकेत झाले. पुढे वसईतील विविध समाजाच्या सहकारी संस्था स्थापन झाल्या. आज वसईत मोठय़ा प्रमाणात सहकारी पतसंस्था, शेतकरी, मच्छीमार यांच्या सहकारी संस्था कार्यरत असून त्याचा फायदा सर्वसामान्यांना होत आहे. वसईतील सहकारी संस्थांचा व्याप पाहता वसई तालुक्यात सहकार भवन व्हावे, अशी मागणी गेल्या कित्येक वर्षांपासून जोर धरू लागलेली आहे.

वसईचे माजी आमदार विवेक पंडित यांनी विधिमंडळात हा प्रश्न उपस्थित केला असता असे भवन उभारण्यासाठी गाव मौजे सांडोर येथील शासकीय जागेतील १५ गुंठे जागा उपलब्ध करून देण्याबाबतचा प्रस्ताव वसईच्या उपनिबंधक कार्यालयामार्फत तत्कालीन ठाणे जिल्हाधिकारी यांना पाठवण्यात आल्याचे तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता यांचा प्रस्तुत जागेबाबतचा ना-हरकत दाखला प्राप्त झाला असल्याचे उत्तर तत्कालीन सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दिले होते. त्यामुळे मागणी मार्गी लागेल, असे चित्र असतानाच महसूल विभागाकडून संबंधित जागा देता येत नसल्याचे वसई उपनिबंधक कार्यालयास कळविण्यात आले, अशी माहिती माहितीच्या अधिकारातून उघडकीस आली आहे.

प्रस्तावित जमिनीवर वर्षभर खाडीचे पाणी साचलेले असते. त्या जागेवर तिवरांची झाडे आहेत. तसेच या जागेवरून उच्च दाबाची वीजवाहिनी गेल्यामुळे सदरची जागा देत नसल्याने जिल्हाधिकारी स्तरावरूनच प्रस्ताव नाकारण्यात आल्याची माहिती वसईच्या उपनिबंधकांनी सामाजिक कार्यकर्ता जॉय फरगोज यांना दिली.  उपनिबंधक कार्यालयाने वेळोवेळी वसई तथा माणिकपूर मंडळ अधिकाऱ्यांना पत्र देऊन सहकार भवन उभारण्याकरिता सरकारी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. मात्र आजपर्यंत सरकारी जागा उपलब्ध होऊ  शकलेली नाही.

भूमाफिया बळकावत असलेल्या सरकारी जागांकडे शासकीय यंत्रणा दुर्लक्ष करत असताना वसईसारख्या सहकारात अग्रेसर राहिलेल्या तालुक्याला सहकार भवन बांधण्यासाठी सरकारी जागा मिळू नये, ही अत्यंत खेदाची बाब आहे. सहकारातील धुरिणांनी हा प्रश्न लावून धरावयास हवा.

-जोस्पीन फरगोज, माजी नगरसेविका

पालघर जिल्ह्य़ातील सहकाराचा बालेकिल्ला असलेल्या वसईत सहकार भवन उभारण्यासाठी सरकारी जागा उपलब्ध व्हायलाच हवी. जागा मिळत नाही, ही सबब होऊ  शकत नाही. सहकार भवनसाठी जागा मिळावी यासाठी आपण निश्चितच वरिष्ठ स्तरावर प्रयत्न करू.

-डॉमनिक गोन्सालवीस, माजी आमदार तथा सहकारातील ज्येष्ठ जाणकार 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 11, 2019 2:30 am

Web Title: government plot not available for sahakar bhavan proposal zws 70
Next Stories
1 येऊरमधील प्रभात फेरीसाठी प्रवेशपत्र बंधनकारक
2 ‘लोकांकिका’ प्राथमिक फेरीचा अनुभव अविस्मरणीय
3 कोंडीचा घोडबंदर
Just Now!
X