‘शिरपूर पॅटर्न’चे प्रणेते खानापूरकर यांचा आरोप

पाऊस कमी झाला ही राज्यकर्त्यांनी पसरवलेली अफवा आहे. सरासरी पाऊस वाढत असून पाऊस कमी झालेला नाही. पावसाचे पडणे आपल्या हातात नसले तरी पावसाच्या पाण्याला कुठे अडवावे हे आपल्या हातात आहे. असे न केल्यास २०२५ साली सगळ्यांचे पाण्याअभावी अतोनात हाल होतील, असे इशारावजा प्रतिपादन शिरपूर पॅटर्नचे प्रणेते व जलतज्ज्ञ सुरेश खानापूरकर यांनी येथे केले. ते शनिवारी रात्री बदलापुरातील काका गोळे फाऊंडेशन येथे झालेल्या संकल्प व्याख्यानमालेच्या निमित्ताने बोलत होते.

पुढे खानापूरकर म्हणाले की, आजचे शासन जलसंधारणाबाबत गंभीर नाही. सध्या शासनाकडून बांधण्यात येणाऱ्या बंधाऱ्यांच्या कामात गुणवत्तेचा अभाव दिसतो. देशभर मंदिर बांधण्याऐवजी जलमंदिर बांधण्यात राज्यकर्त्यांनी पुढाकार घ्यायला पाहिजे. तसेच पाणी अडवण्यासाठी वनीकरण महत्त्वाचे आहे, असे त्यांनी आवर्जून सांगितले. राज्य सरकारकडून दरवर्षी केले जाणारे वृक्षारोपणाचे आकडे नित्यनेमाने प्रसिद्ध होत असतात. हे आकडे खरे मानले तर राज्यात झाड लावण्यासाठी जागाही सापडणार नाही. प्रत्यक्षात चित्र भकास का दिसते, असा सवालही त्यांनी या वेळी उपस्थित केला. झाडाचा पाचवा वाढदिवस साजरा करण्याच्या हेतूनेच झाड लावावे, असे त्यांनी स्पष्ट केले. शासनाला या कशाचेच भान नसून सर्व कार्यकारी अभियंते सध्या खोटय़ा मंजुऱ्या देत असल्याचा गंभीर आरोप या वेळी त्यांनी केला. राज्याच्या कृषी विभागाने संशोधन केले पाहिजे, जलसंधारण हे भूजल शास्त्रज्ञ व अभियंत्यांचे काम आहे. मात्र, भूजलशास्त्रज्ञ शासनाच्या कृषी विभागात नाहीत, त्यामुळे सध्याची जलसंधारणाची कामे ही अतांत्रिक लोकांकडून होत असल्याचे त्यांनी सांगितले.

या वेळी मुरबाडचे आमदार किसन कथोरे, तनुजा गोळे, आशीष गोळे, कृषिभूषण पुरस्कार विजेते राजेंद्र भट आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी कृषी क्षेत्रातील सरकारी कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.