ठाणे महापालिकेतील अधिकारी, तेथील लोकप्रतिनिधी आणि शहराला स्मार्ट बनवू पाहणारे नियोजनकार असे सगळे सध्या खुशीची गाजरे खाऊ लागले आहेत. त्यास कारणही तसे आहे. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या ‘स्मार्ट सिटी’ योजनेच्या अंतिम यादीत ठाण्याचा समावेश व्हावा यासाठी महापालिकेने गेल्या काही आठवडय़ांपासून शहरातील विविध सोयी, सुविधांच्या बाबतीत ठाणेकरांची मते जाणून घेण्यास सुरुवात केली आहे. ही मते जाणून घेताना शहर विकासाच्या नव्या आराखडय़ाविषयी नागरिकांना काही सूचना करावयाच्या असल्यास त्याही स्वीकारल्या जात आहेत. या सर्वेक्षण मोहिमेत जवळपास ६३ टक्के ठाणेकरांनी शहरातील दळणवळण आणि वाहतूक व्यवस्था अत्यंत सुनियोजित आहे, असे मत नोंदविल्याचा महापालिकेचा दावा आहे. त्यासाठी सुमारे एक लाख सूचना अर्जाचा दाखला महापालिकेतील वरिष्ठ अधिकारी देत आहेत. ठाणे महापालिका परिवहन व्यवस्थेचे वाजलेले तीनतेरा, मुजोर रिक्षाचालकांची अरेरावी, बेकायदा प्रवासी वाहतुकीस असलेल्या मर्यादा यामुळे रेल्वे स्थानक ते घर असा प्रवास करताना दररोज ठाणेकर अक्षरश: मेटाकुटीला येतात. असे असताना येथील दळणवळण आणि वाहतूक व्यवस्था सुनियोजित वाटावी हेच मुळी धक्कादायक आहे. सकाळ-सायंकाळी गर्दीच्या वेळेत ठाणे स्थानकाबाहेरील गावदेवी रिक्षा थांब्यावर प्रवाशांचे होणारे हाल ज्या कुणाला ठाऊक आहेत त्याचा खरा तर या सर्वेक्षणावर विश्वास बसणार नाही अथवा त्यातील निरीक्षणे ठरवून तयार करण्यात आली आहेत, असा संशय आल्यावाचून राहणार नाही. गावदेवी रिक्षा थांबा हे खरे तर ठाणेकर प्रवाशी दररोज जे काही सहन करतात याचे एक उदाहरण ठरावे. स्थानक ते घर या प्रवासात असे छळछावणीचे थांबे अनेक आहेत. त्यामुळे शहरातील दळणवळण व्यवस्था उत्तम आहे असे निरीक्षण नोंदविणारे नेमके आहेत तरी कोण, याची खरी तर पडताळणी करायला हवी.
सुनियोजित शहरे उभी करण्याची परंपरा मुळात आपल्या देशाला नाही. त्यामुळे नियोजित, आखीव अशी शहरे कशी असतात, त्यातील सार्वजनिक सुविधांचे मापदंड कशाच्या आधारे ठरविले जातात, मोकळ्या जागांचे महत्त्व जाणून घेण्याची मानसिकता काही अपवाद वगळले तर बहुतांशांकडे नसते असेच दिसून येते. शहर नियोजनाच्या आघाडीवर मुळात चांगले काय हेच ठाऊक नसल्याने बऱ्याच पातळीवर सुविधांचे गुणांकन करण्याची मानसिकता बहुधा भारतीय मानसिकतेत रुजली असावी. त्यामुळे मुंबईपेक्षा ठाणे बरे आणि ठाण्यापेक्षा नवी मुंबई सर्वोत्तम अशी सहज-सोपी वर्गवारी करून आपण मोकळे होत असतो. ठाणे महापालिकेने स्मार्ट सिटीच्या माध्यमातून नुकतेच केलेले सर्वेक्षण जर खरे मानायचे झाल्यास ठाणेकरांनी नोंदविलेल्या निरीक्षणांना या अशाच मानसिकतेची फूटपट्टी लावावी लागेल. मुळात ठाण्याच्या वाहतूक व्यवस्थेत सुनियोजित म्हणावे असे फार काही नाही. ठाणे महापालिका परिवहन उपकम हे या शहरातील अंतर्गत वाहतूक व्यवस्थेचे सर्वात महत्त्वाचे साधन आहे. त्यापाठोपाठ रिक्षा, खासगी दुचाकी आणि घोडबंदर ते रेल्वे स्थानक अशा मार्गावर गेल्या काही वर्र्षांत बाळसे धरू लागलेली बेकायदेशीर बसगाडय़ांची व्यवस्था अशी इतर साधने ठाणेकरांना उपलब्ध आहेत. गेल्या दशकभरात एकटय़ा ठाणे शहराची लोकसंख्या पाच ते आठ लाखांनी वाढली आहे. मूळ शहर आणि द्रुतगती महामार्गाच्या पश्चिमेकडे झपाटय़ाने विकसित होत असलेल्या वागळे इस्टेट, वर्तकनगर, घोडबंदर या सर्व परिसराचा गेल्या काही वषार्र्तील विस्तार लक्षात घेतला तर दळणवळणाची अन्य काही साधने या शहरात यापूर्वीच उभी करण्याचा विचार व्हायला हवा होता. जवळपास अर्धेअधिक ठाणे शहर आणि कळव्यातील प्रवाशांचा काही टक्का दररोज एकटय़ा ठाणे स्थानकावर येऊन आदळत असतो. मुंबईच्या दिशेने प्रवास करण्यासाठी या नागरिकांपुढे रेल्वे हे एकमेव सोयीचे साधन आहे. खासगी वाहने, अथवा बसने मुंबईची गदी भेदत इच्छित स्थळी जाणे हे एक प्रकारचे दिव्यच. त्यामुळे ठाणे स्थानकावर प्रवाशांचा पडणारा भार दिवसागणिक वाढत जाणार आहे. याचे भान राज्य आणि स्थानिक पातळीवरील राज्यकर्त्यांना नव्हते असे नाही. बिल्डरांच्या मोठय़ा गृहसंकुलांना एकापाठोपाठ एक मंजुऱ्या देण्यात गर्क असलेल्या प्रशासकीय व्यवस्थेला ठाणे स्थानकातील गर्दी वाढत आहे हे कळत नसावे असे मानणे हास्यास्पद ठरेल. घोडबंदरचा विकास सुरू होताना मुलुंड आणि ठाणे स्थानकादरम्यान किमान एका विस्तारित स्थानकाची गरज यापूर्वीही बोलून दाखविण्यात आली आहे. असे स्थानक उभे करणे हे खरे तर राजकीय इच्छाशक्तीवर अवलंबून आहे. मात्र इतक्या वर्षांत नव्या विस्तारित स्थानकाचे कागदी घोडे नाचविण्याच्या पलीकडे ठाणेकरांच्या हाती फार काही लागले नाही. त्यामुळे दररोज घरातून निघायचे आणि एकाच स्थानकावर येऊन आदळण्याशिवाय त्यांच्यापुढे दुसरा पर्यायही नाही. सुमारे सात लाख प्रवासी एका स्थानकातून दररोज प्रवास करीत असतील तर संपूर्ण शहराच्या वाहतूक व्यवस्थेवरील भार वाढतच जाणार. हे चित्र खरे तर ठाणे परिवहन उपक्रमासाठी आशादायी ठरायला हवे होते. प्रवासी गर्दीचे मार्ग निश्चित असल्याने उत्तम नियोजनाच्या आधारे नफ्याचे गणित जुळविणे परिवहन उपक्रमासाठी कठीण नव्हते. मात्र वर्षांनुवर्षे उपक्रमात झालेल्या राजकीय खोगीरभरतीने टीएमटीचा कणाच मोडून पडला आहे. काही वर्षांपूर्वी आर. ए. राजीव आणि आता संजीव जयस्वाल यांच्यासारखे अधिकारी ही व्यवस्था पुन्हा उभी राहावी यासाठी जिवाचे रान करताना दिसतात खरे, मात्र वर्षांनुवर्षे किडलेली यंत्रणा सक्षमपणे उभी करणे त्यांनाही कितपत शक्य होईल याविषयी खात्री देता येत नाही.
बेकायदा वाहतूक व्यवस्थेचा जोर
ठाण्याची म्हणून अशी जी काही वाहतूक व्यवस्था आहे तीच रडतखडत सुरू असल्याने गेल्या काही वर्षांत घोडबंदर ते ठाणे या मार्गावर बेकायदा प्रवासी बसगाडय़ांनी चांगलाच जोर धरला आहे. पूर्व द्रुतगती महामार्गावरून कोपरीच्या दिशेने स्थानकाच्या पूर्वेकडे धावणाऱ्या या बसेस दररोज हजारोंच्या संख्येने प्रवाशांची वाहतूक करतात. यापैकी अध्र्याहून अधिक बसेसना वाहतूक परवाना नाही. म्हणजे ही वाहतूक अवैधच म्हणायला हवी. तरीही ती ठाणेकरांना सोयीची वाटते हे खरे तर महापालिकेसारख्या मोठय़ा व्यवस्थेला शरमेने मान खाली घालायला लावण्यासारखे आहे. झपाटय़ाने विकसित होत असलेल्या घोडबंदरमधील गृहसंकुलात राहणाऱ्या रहिवाशांना ठाणे स्थानकाच्या दिशेने येण्यासाठी ही अवैध प्रवासी वाहतूक सोयीची वाटते. दहा ते पंधरा रुपयांमध्ये प्रवास होतो आणि गर्दीचे नियोजनही योग्य होत असल्याने प्रवाशांना टीएमटीपेक्षा ही वाहतूक हवीहवीशी वाटू लागली आहे. अवैध बसगाडय़ा ज्या मार्गावर धावतात त्या मार्गावरील वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करणे टीएमटीसाठी सोपे नाही. तरीही त्याकडे इतक्या वर्षांत कुणी लक्ष दिलेले नाही. यामध्ये अवैध वाहतूकदारांसोबत व्यवस्थापनातील काहींचे साटेलोटे असेल अशी शंका घेण्यासही वाव आहे. ठाणे स्थानकापासून लोकमान्यनगर, यशोधननगर, सावरकरनगर, पवारनगर असा प्रवास म्हणजे दिव्यच ठरू लागले आहे. या भागातील प्रवाशांना टीएमटीपेक्षा रिक्षा सेवा कधीही सोयीची वाटते. द्रुतगती महामार्गालगत राहणारे लुईसवाडी आणि अन्य भागातील ज्या प्रवाशांकडे खासगी दुचाकी नाही त्यांनाही रिक्षा हा सोयीचा मार्ग दिसतो. त्यामुळे टीएमटीपाठोपाठ रिक्षा प्रवास हा ठाणेकरांसाठी महत्त्वाचा आहे. तरीही मुजोर चालक आणि त्यांना असलेल्या राजाश्रयामुळे या व्यवस्थेचे योग्य नियोजन करण्यातही प्रशासनाला फारसे यश आले आहे असे म्हणता येत नाही. सकाळी रेल्वे स्थानक गाठताना आणि सायंकाळी परतीच्या प्रवासात सहज रिक्षा मिळाली तर कोण आनंद, अशी ठाणेकरांची अवस्था आहे. आरटीओ आणि वाहतूक पोलिसांनी आखून दिलेल्या रिक्षा थांब्यावर सगळे काही आलबेल आहे, असे म्हणण्याजोगी परिस्थिती आजही नाही. राहिला प्रश्न वाहतूक नियोजनाचा, तर त्या आघाडीवर सावळागोंधळ नसला तरी भौगोलिक आणि नियोजनाच्या मर्यादा यापूर्वीच दिसून आल्या आहेत. मूळ शहरातील रस्त्यांच्या रुंदीकरणास फारसा वाव असा राहिलेला नाही. त्यामुळे हजारोंच्या संख्येने येऊन धडकणाऱ्या वाहनांचा भार पेलवू शकेल अशी मुळी या शहराची क्षमताच राहिलेली नाही. त्यामुळे वाहतूक कोंडीपासून मुक्ती हवी असेल तर रेल्वे स्थानक परिसरातील एकंदर सुविधांच्या पुनर्निर्माणाशिवाय आता पर्याय नाही आणि आयुक्त जयस्वाल यांना वाटतो तितका तो सहज शक्यही नाही.