कल्याण शहरातील वाहतूक कोंडी सोडविणारा महत्त्वाचा पत्रीपूल ते दुर्गाडी हा गोविंदवाडी भागातून गेलेल्या बाह्य़ वळण रस्त्याचे काम पुन्हा सुरू करण्यात आले आहे. हा रस्ता एका तबेला मालकाच्या अडवणुकीमुळे रखडला होता. गेल्या सहा वर्षांपासून रखडलेला हा रस्ता पालिका निवडणुकीपूर्वी मार्गी लागावा; यासाठी तेथील एका धार्मिक स्थळाला वळण देऊन हा रस्ता पूर्ण करण्याच्या हालचाली पालिका प्रशासनाने सुरू केल्या आहेत.या कामासाठी पालिकेच्या विकास योजनेतील खाडी किनाऱ्याच्या बाजूने २०० मीटर लांब व ३० मीटर रुंद रस्त्याच्या रूपरेषेत बदल करण्यात आला आहे. गोविंदवाडी रस्ते कामामध्ये एका धार्मिक स्थळ आहे. स्थानिक रहिवाशांनी पालिकेला रस्त्यासाठी या स्थळावर कारवाई करू नये, अशी विनंती तत्कालीन आयुक्तांकडे केली होती. माजी आयुक्तांनी ही विनंती मान्य केली होती. तत्कालीन आयुक्तांच्या मान्यतेनंतर रस्ता रूपरेषेत बदल करण्याचा निर्णय झाला होता. या बदलाला सर्वसाधारण सभेची अंतिम मान्यता घेण्यात आली.गेल्या पाच ते सहा वर्षांपासून पत्रीपूल ते दुर्गाडी पूल जोडणाऱ्या गोविंदवाडी रस्त्याचे काम सुरू आहे. एक किलोमीटरच्या या रस्ते कामात तबेले, घरे अशी बांधकामे होती. पालिकेने ही बांधकामे जमीनदोस्त करून रहिवाशांचे पुनर्वसन केले आहे. काहींना मोबदला दिला. पालिकेने राज्य रस्ते विकास महामंडळाच्या ताब्यात हा रस्ता करण्यासाठी दिला. महामंडळाने ८० टक्के रस्ता तयार केला आहे. ३० मीटर रुंदीचा हा रस्ता आहे. तबेलाो तोडू नये म्हणून तबेला मालकाने न्यायालयात धाव घेतली आहे. न्यायालयाने तबेला मालकाचे म्हणणे ऐकल्याशिवाय पालिकेने तबेल्याबाबत कोणतीही कार्यवाही करू नये, अशा सूचना दिल्या आहेत. महामंडळाने गोविंदवाडी रस्त्याचे ८० टक्के काम पूर्ण केले आहे. फक्त ११५ मीटरचा धार्मिक स्थळ, तबेला असलेला भाग रखडला आहे. एक तबेला हटत नसल्याने रस्त्याचे काम रखडले आहे. तसेच शहरातील वाहतुकीचा भार दिवसेंदिवस वाढत असल्याने वाहतूक कोंडीत भर पडत आहे.  एमएसआरडीसीने बांधलेल्या रस्त्याला धार्मिक स्थळाच्या भागात २०० मीटरचे वळण द्यायचे. पुढे हा रस्ता दुर्गाडी किल्याच्या दिशेने अपूर्ण असलेल्या रस्त्याला जोडायचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.  गोविंदवाडी रस्ता पूर्ण होत नसल्याने शिवाजी चौक मार्गे पत्रीपूल होणाऱ्या वाहतूक कोंडीत दिवसेंदिवस भर पडत आहे. या कोंडीमुळे शहरवासीय हैराण आहेत. गोविंदवाडी रस्ता पूर्ण झाल्यानंतर शिवाजी चौक मार्गे होणारी सर्व अवजड वाहनांची वाहतूक शहराबाहेरून होणार आहे.