आयुक्तांचे आदेश; तबेल्यावर कारवाई नाही

कल्याणमधील गोविंदवाडी बाहय़वळण रस्त्याला अडथळा ठरणारी बाजारपेठ विभागातील दुतर्फा असलेली अनधिकृत बांधकामे महापालिका आयुक्तांच्या आदेशावरून ‘क’ प्रभागाच्या अनधिकृत बांधकाम हटाव पथकाने जमीनदोस्त केली.

मागील सहा वर्षांपासून पत्रीपुलाजवळून गोविंदवाडीमधून दुर्गाडी किल्ला दिशेने जाणाऱ्या बाहय़वळण रस्त्याचे काम रखडले आहे. या एक किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे दोन्ही बाजूंकडील बहुतांश काम पूर्ण झाले आहे. या रस्त्याच्या ४०० मीटरच्या टप्प्यात एक तबेला आणि काही अनधिकृत पक्क्य़ा टपऱ्या तसेच काही बेकायदा बांधकामे आहेत. रस्तेकामासाठी या भागातील अनेक कुटुंबीयांचे महापालिकेने अन्यत्र स्थलांतर केले आहे. काही कुटुंबे मात्र घराचा, टपरीचा ताबा सोडण्यास तयार नाहीत. या रस्त्याला अडथळा आणणाऱ्या तबेला मालकाला पर्यायी जमीन, शासकीय दरानुसार रक्कम देण्याची तयारी पालिकेने गेल्या सात वर्षांत केली. पालिका अधिकाऱ्यांच्या मिनतवाऱ्यांना तबेलामालक दाद देत नाही. तबेल्यावर कारवाई करताना पहिले तबेलामालकाचे म्हणणे ऐकून घ्यावे आणि तबेल्यावर कारवाई करू नये, असा आदेश न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे पालिकेची कोंडी झाली आहे.

गोविंदवाडी बाहय़वळण रस्ता पूर्ण झाला तर शिळफाटाकडून येणारी वाहतूक दुर्गाडी दिशेने जाईल. भिवंडीकडून येणारी वाहने दुर्गाडीकडून गोविंदवाडी रस्त्याने पत्रीपुलाकडे येतील. या वळण रस्त्यामुळे शिवाजी चौकात येणारा वाहनांचा भार कमी होण्यास मदत होणार आहे, असे वाहतूक अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

गोविंदवाडी बाहय़वळण रस्त्याला अडथळा ठरणारी १५ ते २० पक्की अनधिकृत बांधकामे आयुक्तांच्या आदेशावरून कालपासून जमीनदोस्त करण्यात येत आहेत. मोकळ्या झालेल्या जागेवर तातडीने रस्त्याचे काम सुरू करण्यात येणार आहे. या भागातील तबेल्याच्या कारवाईवर न्यायालयाचा स्थगिती आदेश आहे. त्यामुळे याबाबत वरिष्ठ पातळीवर जो निर्णय होईल, त्याप्रमाणे कार्यवाहीचा निर्णय घेण्यात येईल.

अरुण वानखेडे, ‘क’ प्रभाग अधिकारी, कल्याण</strong>