News Flash

धान्य बाजार आजपासून सुरू

ठाण्याचे पालकमंत्री, घाऊक व्यापाऱ्यांच्या बैठकीत निर्णय

(संग्रहित छायाचित्र)

मुंबई, ठाणे, नवी मुंबई तसेच आसपासच्या परिसरास अन्नधान्याचा पुरवठा करणाऱ्या वाशी येथील बाजारपेठेमधील व्यवहार गुरुवारपासून सुरू करण्याचा निर्णय बुधवारी सायंकाळी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

भाजीपाला तसेच कांदा-बटाटय़ाच्या घाऊक बाजारपेठा मंगळवारपासून सुरू झाल्या आहेत. मात्र, राज्य सरकारच्या वैधमापन शास्त्र आणि दक्षता विभागाने सोमवारी धान्य बाजारात छापे टाकल्यामुळे अस्वस्थ झालेल्या व्यापाऱ्यांनी व्यवहार सुरू करायचे नाहीत अशी भूमिका घेतली होती. पालकमंत्री शिंदे यांनी बुधवारी यासंबंधी व्यापाऱ्यांची बैठक घेतली.

करोनाच्या पार्श्वभूमीवर या बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी काम बंद ठेवण्याचा निर्णय मागील आठवडय़ात घेतला होता. करोनाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी वैधमापन आणि दक्षता विभागाने वाशी येथील अन्नधान्याच्या बाजारपेठेत धाड टाकून दोन कोटी रुपयांचा कडधान्याचा साठा जप्त केला. साठेबाजी आणि चढय़ा दराने अन्नधान्याची विक्री होत असल्याचा संशय व्यक्त करत ही कारवाई करण्यात आली होती. यावेळी बाजारातील गोदामांची तपासणी करण्यात आली. तसेच काही व्यापाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यामुळे अन्नधान्य बाजारातील व्यापाऱ्यांचा एक मोठा गट अस्वस्थ झाला होता. कोणत्याही परिस्थितीत हा बाजार सुरु केला जाणार नाही अशी भूमिका व्यापाऱ्यांच्या एका मोठय़ा गटाने घेतली होती.

वाशी येथील घाऊक बाजारपेठेत काम करणारे व्यापारी, माथाडी यांच्या आरोग्याची काळजी घेतली जाईल. त्यासाठी योग्य ते उपाय आखले जातील. सरकारच्या विनंतीला मान देऊन आणि संवेदनशील काळात व्यापाऱ्यांनी अन्नधान्याचा पुरवठा पूर्ववत करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार गुरुवारपासून या बाजारपेठा सुरु होतील.

-एकनाथ शिंदे, पालकमंत्री ठाणे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 16, 2020 1:15 am

Web Title: grain market started today abn 97
टॅग : Coronavirus
Next Stories
1 सिगारेटच्या वादातून तरुणाची हत्या
2 Coronavirus : चाचणीला चारचाकीतूनच या!
3 Coronavirus Outbreak : दोन पोलीस ठाण्यांतील ६० कर्मचाऱ्यांचे विलगीकरण
Just Now!
X