ठाकुर्लीतील जागृत महिलांमुळे चालकाचे कारस्थान उघड

ठाकुर्ली-चोळे येथील ग्राहक शिधावाटप दुकानात गेल्यानंतर त्यांना पुरेसे धान्य देण्यात येत नसल्याचे निदर्शनास आल्यावर बुधवारी सकाळी नगरसेविकेसह, ग्राहक महिलांनी शिधावाटप दुकानदाराला घेराव घातला.

शिधावाटप वाटप दुकानात शिधापत्रिकातील कुटुंब सदस्य संख्येप्रमाणे धान्य दिले जात नाही. दोन महिने शिधापत्रिकेवर तूरडाळ दिली जात नाही. ग्राहकांना धान्य खरेदीच्या पावत्या दिल्या जात नाहीत, अशा तक्रारी होत्या.

शिधापत्रिकेतील सदस्य संख्येपमाणे पाच किलो गहू देणे अपेक्षित असताना अनेक वेळा धान्य साठा पुरेसा नाही कारण देऊन दोन किलो धान्य ग्राहकांच्या माथी  मारले जाते. दोन महिन्यांपासून तूरडाळ वाटप करण्यात आली नाही. शासनाकडून पुरेसा अन्नधान्य साठा दुकानात येत असूनही पुरेसे धान्य हा दुकान चालक ग्राहकांना देत नसल्याचे निदर्शनास आले.

बहुतेक ग्राहक हे चाळ, झोपडपट्टीमधील रहिवासी आहेत. ते दुकानदाराच्या तक्रारी केल्या तर धान्य मिळणार नाही या भीतीने अनेक महिने तक्रार करीत नव्हते. दिवाळी सण आला तरी दुकानदार पुरेसे धान्य देत नाही हे लक्षात आल्यावर महिला ग्राहक जागृत होऊन त्यांनी नगरसेविका प्रमिला चौधरी यांच्याकडे तक्रार केली. धान्य खरेदी केल्यानंतर ग्राहकांना खरेदीची पावती दिली जात नाही.  दुकानदार बनावट पावत्या तयार करून धान्याचा अपहार करीत असल्याचे स्पष्ट झाल्यामुळे या दुकानदारावर फौजदारी गुन्हा दाखल करावा आणि त्याचा परवाना निलंबित करावा, अशी मागणी करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

शिधावाटप अधिकारी पोटसुते, निरीक्षक पूजा तांबे शिधावाटप दुकानात दाखल झाल्या. उपस्थित ग्राहक महिलांनी शिधावापट दुकानदार गहू, तांदूळ, साखर देताना करीत असलेल्या अपहाराची माहिती दिली.