मुरबाडच्या शेलारीत आजी-आजोबांच्या शाळेला सुरुवात

मुरबाडजवळच्या शेलारीत रविवारी बाराखडीचे सूर घुमत होते. शेलारीगावाजवळच्या म्हाडस पाडय़ाच्या चौदा एकर जागेत एका छोटेखानी झोपडीत एक महिला शिक्षिका बाराखडीची उजळणी करत होत्या. मात्र या शाळेतील विद्यार्थी होते अवघ्या सत्तरीतले. शिक्षणाला वयाचे बंधन नसते हा विचार सत्यात उतरणाऱ्या योगेंद्र बांगर यांच्या फांगणे येथील आजीबाईंच्या शाळेच्या यशस्वी प्रयोगानंतर आजोबांनाही शिक्षण देण्याच्या उद्देशाने मोतीलाल दलाल चॅरिटेबल ट्रस्टच्या मदतीने आजी आजोबांच्या शाळेला सुरुवात केली.

रविवारचा दिवस मुरबाडजवळील शेलारी गावासाठी वेगळाच होता. शेलारी गावापासून अवघ्या किलोमीटरवर असलेल्या निसर्ग पर्यटनच्या जागेवर सकाळपासून गडबड सुरू होती. सकाळी अकराच्या सुमारास शेलारी आणि आसपासच्या गावातील वयोवृद्ध महिला केशरी रंगाच्या नऊवारीत केंद्राकडे चालत जात होत्या. तर त्यांच्या जोडीला धोतर, सदरा आणि टोपी घातलेले आजोबाही शाळेचे दप्तर घेऊन चालत होते. योगेंद्र बांगर यांच्या पर्यटन केंद्रातही जय्यत तयारी करण्यात आली होती. एक छोटेखानी झोपडीवजा वर्ग सजवण्यात आला होता. बाहेर रांगोळी तर शेजारच्या झाडावर संपूर्ण बाराखडीचे फलक लावण्यात आले होते. आणि बाराच्या सुमारास सुरू झाला ऐतिहासिक आजी-आजोबांच्या शाळेचा पहिला तास. शिक्षणाला वयाचे बंधन नसते, हा सुविचार लिहिलेल्या फलकावर आजी-आजोबांनी बाराखडी गिरवण्यास सुरुवात केली. मुरबाडजवळील फांगणे गावातील पहिल्यावहिल्या आजीबाईंच्या शाळेची दखल देशविदेशातील व्यक्तींनी घेतल्यानंतर या शाळेला सुरुवात करणाऱ्या योगेंद्र बांगर यांनी मोतीराम दलाल चॅरिटेबल ट्रस्टच्या मदतीने आजी आजोबांच्या शाळेची संकल्पना मांडली.

त्यानुसार आपल्या स्वत:च्या जागेवरच त्यांनी वर्ग उभारत शाळेला सुरुवात केली. निसर्गरम्य ठिकाणी म्हाडस नदीच्या किनाऱ्यावर उभारलेल्या वर्गात रविवारी पहिलावाहिला आजी-आजोबांचा वर्ग सुरू झाला.

नातवंडांना खेळवण्याचे वयात पाटी-पेन्सिल हाती घेणाऱ्या आजी-आजोबांच्या शाळेची चर्चा सर्वत्र होती. या वेळी फांगणे येथील शाळेतील विद्यार्थी आजीही उपस्थित होत्या. याप्रसंगी दिलीप दलाल, श्रुती शर्मा उपस्थित होत्या.

आजी-आजोबांना त्यांच्या उमेदीच्या काळात शिक्षण घेता आले नाही. त्यामुळे किमान प्राथमिक शिक्षण देण्याचा प्रयत्न करण्यासाठी ही शाळा सुरू केली. आजी-आजोबांच्या या शाळेत शिक्षणासोबतच त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली जाणार  आहे.

योगेंद्र बांगर, शिक्षक