News Flash

शिवमंदिर आर्ट फेस्टिवलचे शानदार उद्घाटन

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशनच्यावतीने आयोजित या कार्यक्रमाचा ‘लोकसत्ता’ माध्यम प्रायोजक  आहे.

नवी दिल्ली येथे येत्या सोमवारी भव्य शिवजयंती महोत्सव होणार आहे. या महोत्सवासाठी अंबरनाथकरांच्या वतीने खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाच लाख रुपयांचा धनादेश छत्रपती संभाजीराजे भोसले यांच्याकडे सुपूर्द केला.

हजारो रसिकांच्या उपस्थितीत शुक्रवारी संध्याकाळी येथील प्राचीन शिवमंदिरासमोरील भव्य रंगमंचावर खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत येथील शिवमंदिर आर्ट फेस्टिव्हलचे शानदार उद्घाटन करण्यात आले. राज्यात सांस्कृतिक वारसा असलेली अनेक मोठी शहरे आहेत. मात्र अंबरनाथसारख्या छोटय़ा शहरात सांस्कृतिक चळवळ जोपासण्याचे कार्य शिवमंदिर आर्ट फेस्टिव्हलच्या माध्यमातून करीत असल्याबद्दल छत्रपतींनी आयोजकांचे कौतुक केले. तसेच कलेला प्रोत्साहन देत असल्याबद्दल आनंद व्यक्त केला. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशनच्यावतीने आयोजित या कार्यक्रमाचा ‘लोकसत्ता’ माध्यम प्रायोजक  आहे.

स्वतंत्र भारताच्या इतिहासात यंदा प्रथमच नवी दिल्ली इथे अतिशय भव्य स्वरूपात शिवजयंती उत्सव साजरा होणार आहे. राष्ट्रपती या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी या उत्सवासाठी पुढाकार घेतला आहे. त्याचे औचित्य साधून शिवमंदिर आर्ट फेस्टिव्हलच्या उद्घाटन सोहळ्यात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी अंबरनाथकरांच्या वतीने पाच लाख रुपयांचा धनादेश या सोहळ्यासाठी संभाजीराजे भोसले यांच्याकडे सुपूर्द केला.

‘अंबरनाथ येथील प्राचीन शिवमंदिराचे जतन, संवर्धन आणि सौंदर्यीकरण व्हावे, ही शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांची इच्छा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे पूर्ण करीत आहेत. शिवमंदिर आर्ट फेस्टिव्हल हा त्याचाच एक भाग आहे. अल्पावधीतच या महोत्सवाची मुंबईतील काळाघोडा अथवा ठाण्यातील उपवन कला महोत्सवाशी तुलना केली जाऊ लागली आहे. शहरवासीयांना चांगल्या दर्जाच्या सुविधा देण्याबरोबरच येथील सांस्कृतिक चळवळीलाही प्रोत्साहन देण्याबाबत शिवसेना पक्ष भविष्यातही कटिबद्ध असेल, असे प्रतिपादन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी केले.

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, अभिनेत्री मनवा नाईक, आमदार रवींद्र फाटक, सुभाष भोईर, डॉ. बालाजी किणीकर, जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, नगराध्यक्षा मनीषा वाळेकर, शिवमंदिर आर्ट फेस्टिव्हलचे संयोजक अरविंद वाळेकर, माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी आदी यावेळी उपस्थित होते.

परिसराला तेजाची झळाळी

नेत्रदीपक रोषणाई, शोभेच्या फटाक्यांची आतषबाजी आणि आकर्षक रंगसंगतीच्या सजावटीने शिवमंदिर परिसर तेजाने लखलखत होता. मुख्य मंडपात हजारो रसिक कार्यक्रमाचा आनंद घेत असताना शेकडो शौकीन या बाहेरील रंगोत्सवाचा मनमुराद आनंद घेत होते.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 17, 2018 2:22 am

Web Title: great opening of shiv mandir art festival in ambernath
Next Stories
1 सेंच्युरी रेयॉनमधील गॅसगळतीत कामगाराचा मृत्यू
2 ठाण्यात आता रात्र महाविद्यालय
3 ठाण्यातून एसटीचा गारेगार प्रवास
Just Now!
X