वर्सोवा पूल दुरुस्तीच्या कामास सुरुवात;  बोईसर-वर्सोवा अंतर कापण्यास पाच तासांचा अवधी

 

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर वर्सोवा येथे नवीन खाडीपुलाच्या दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आल्याने शुक्रवारी मोठय़ा प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. महामार्गावर बोईसर ते वर्सोवा पुलापर्यंतचे अंतर पूर्ण करण्यास नेहमी दीड तास लागतो, मात्र वाहनांच्या मोठय़ा रांगा लागल्याने वाहनचालकांना हे अंतर कापण्यास पाच तास लागत होते.

वसई खाडीवरील वर्सोवा येथील नव्या पुलाच्या दुरुस्तीच्या कामाला गुरुवारी रात्रीपासून सुरुवात झाली आहे. दुरुस्तीच्या कामासाठी पुलावरून केवळ हलक्या वाहनांसाठी एकेरी वाहतूक सुरू ठेवण्यात आली आहे. अवजड वाहनांसाठी वाहतूक बदल करण्यात आला आहे. महामार्गावर सुरत ते दहिसर या मार्गिकेवरील अवजड वाहतूक मनोर- वाडा- भिवंडी, शिरसाट फाटा- गणेशपुरी- वज्रेश्वरी- अंबाडी तसेच चिंचोटी कामण- अंजुर फाटा- भिवंडी या तिन्ही मार्गावरून करण्यात येत आहे. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी अधिसूचना काढली असली तरी या वाहतुकीच्या पर्यायी मार्गाविषयी पुरेशा प्रमाणात माहिती अवजड वाहतूक करणाऱ्या चालकांना नाही.

काही ट्रकचालकांकडे इंधनाची समस्या असते तर काही वाहनचालकांकडे पुरेशा परवानग्या नसल्याने ते या पर्यायी मार्गाचा अवलंब करण्यासाठी विरोध दर्शवतात. वाहतूक पोलिसांशी चर्चा करण्यात आणि समजूत काढण्यात विलंब होत असल्याने अशा ठिकाणी वाहनांच्या लांब रांगा लागल्या. मनोर (मस्तान नाका) येथे अवजड वाहनांना वाडा मार्गे वळवण्यासाठी पोलिसांनी व्यवस्था केल्याने मस्तानपासून सुरतच्या दिशेने पाच ते सात किलोमीटर लांब रांगा लागल्याचे दिसून आले आहे.

शिरसाट फाटा आणि कामण फाटाच्या अलीकडे अवजड वाहनांना पर्यायी मार्गाने वळवण्यासाठी वाहतूक पोलीस कार्यरत असल्याने या सर्व ठिकाणी मोठय़ा प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याचे दिसून आले. अवजड वाहने रस्त्याच्या मधोमध उभे राहून रांगा लावत असल्याने तसेच लहान वाहनांना पुढे जाण्यासाठी मार्ग उपलब्ध होत नसल्याने वाहतूक कोंडी भर पडली.

पालघर- बोईसर ते वर्सोवा पूल हे अंतर सर्वसाधारणपणे कापण्यासाठी सव्वा ते दीड तास लागत असताना आज हे अंतर पार करण्यासाठी तब्बल पाच तास लागल्याचे बोईसर येथील अविनाश चुरी यांनी सांगितले. वर्सोवा पुलाचे काम सुरू राहीपर्यंत याच प्रकारची समस्या कायम राहण्याची शक्यता असून तारापूर तसेच वापी- उंबरगाव पट्टय़ातील औद्योगिक क्षेत्रात दररोज वाहनाद्वारे प्रवास करणाऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. वसई, विरार, भाईंदर आणि घोडबंदर येथेही मोठय़ा प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. अधिसूचनेद्वारे ठरवण्यात आलेल्या मार्गावरून वाहने सोडणे गरजेचे आहे, मात्र महामार्गाच्या विरुद्ध बाजूने गाडय़ा सोडल्या जाऊ लागल्याने त्याचा मोठा फटका वाहनचालकांना बसला. वाहतूक पोलीस विरुद्ध बाजूने वाहने सोडत असल्याने अपघात होण्याची शक्यता असल्याचे प्रवाशांनी सांगितले. वसईत ससूनवघर, ससूपाडा, मालजीपाडा, बाफाने, चिंचोटी येथे वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांची मोठी कोंडी झाली.

पुलाच्या दुरुस्तीचे काम सुरू

वसई खाडीवरील वर्सोवा येथील नव्या पुलाच्या दुरुस्तीच्या कामाला गुरुवारी रात्रीपासून सुरुवात झाली. २६ नोव्हेंबरपासून हे काम सुरू होणार होते, परंतु वाहतूक व्यवस्थेमुळे काम सुरू होण्यास विलंब झाला. आधीच्या वेळापत्रकानुसार २५ डिसेंबपर्यंत हे काम सुरू राहणार आहे. नव्या पुलाची एक बाजू हलक्या वाहनांसाठी मोकळी ठेवण्यात आली आहे आणि दुसऱ्या बाजूला दुरुस्तीचे काम करण्यात येत आहे.

वर्सोवा पुलाच्या दुरुस्तीचे काम प्रत्यक्षात सुरू  झाले असून डहाणूपासून ते थेट वर्सोवा पुलापर्यंत अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी होत आहे. पुरेशा प्रमाणात पोलीस बंदोबस्त असला तरी अवजड वाहनांच्या चालकांना वाहतूक मार्गाचा बदल समजावून सांगण्यास वेळ जात आहे. वाहतूक कोंडीची स्थिती कायम राहिल्यास याबाबत विभागस्तरावर तातडीने चर्चा करून वाहतूक बदलासंदर्भात आणखी काही निर्णय घ्यावे लागतील.

– संपतराव पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, जिल्हा वाहतूक शाखा, पालघर