X
X

वसईतील हरित पट्टा नष्ट होण्याच्या मार्गावर

READ IN APP

हजारो वर्षांपासून हा हरित पट्टा येथील जनतेने आणि शासनाने जपला आहे.

 

माती भराव, वाळू उपसा, कोळंबी प्रकल्पाचा फटका; ‘हरित वसई’ची पुन्हा जनआंदोलनाची साद

वसईच्या पश्चिम पट्टय़ात होत असलेला मातीभराव, कोळंबी प्रकल्प तसेच बिल्डरांनी विकत घेतलेल्या जमिनी यांमुळे वसईचा हरितपट्टा नष्ट होण्याचा धोका निर्माण झाला आहे. वसईतल्या सामाजिक कार्यकर्त्यांनी वसईतल्या जनतेला पुन्हा जनआंदोलनाची हाक दिली आहे, तर वसईतली स्थानिक जनताच या विनाशाला कारणीभूत ठरत असल्याचा गंभीर आरोप ‘हरित वसई संरक्षण समिती’ने केला आहे.

वसईच्या पश्चिम पट्टय़ातील गिरीज आणि भुईगाव येथे होत असलेल्या कोलंबी प्रकल्पासाठी मोठय़ा प्रमाणावर तिवरांच्या झांडाची कत्तल करून मातीभराव करण्यात आला आहे. यामुळे नैसर्गिक नाले बंद झाले असून बागायती पट्टा उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. या प्रकरणी वसईतले सामाजिक कार्यकर्ते फादर फ्रान्सिस दिब्रिटो आणि सायमन मार्टिन यांनी लोकांना आंदोलनात उतरण्याची हाक दिली आहे.

वसईचा पश्चिम पट्टा हा हरितपट्टा म्हणून ओळखला जातो. तो वाचविण्यासाठी तीस वर्षांपूर्वी हरित वसईच्या माध्यमातून मोठे जनआंदोनल उभे राहिले होते. याच कारणांमुळे येथील गावांनी पालिकेत जाण्यास नकार दिला आणि जनउद्रेकही झाला होता. आता हा पट्टा नष्ट केला जात असल्याचा आरोप हरित वसई संरक्षण समितीचे अध्यक्ष मार्कुस डाबरे यांनी केला आहे. भुईगाव आणि गिरीज येथीस खाजण जमिनीवरील तिवरांची झाडे कापून त्यावर बेकायदा होत असलेला मातीभराव हा त्याचाच एक भाग असल्याचे ते म्हणाले. ही सर्व जागा केंद्र सरकारची आहे. १९६०च्या दशकात काही भाग स्थानिक आदिवासी आणि कोळी बांधवांना राहण्यासाठी आणि शेतीसाठी देण्यात आला होता. या जागेवर ०.३३ एफएसआय आहे. येथील जागा विकल्या जात असून बिल्डरांकडून त्या विकत घेतल्या जात आहे. कारण या भागात ४ एफएसआय (चटईक्षेत्र) मंजूर करून टोलेजंग इमारती उभ्या केल्या जातील, असे ते म्हणाले. केवळ लोकप्रतिनिधींना दोष देऊन चालणार नाही तर स्थानिक जनताच याला जबाबदार असल्याचा आरोपही डाबरे यांनी केला. वसईतले सामाजिक कार्यकर्ते आणि धर्मगुरू फ्रान्सिस दिब्रिटो आणि कवी सायमन मार्टिन यांनीही याविरोधात आवाज उठवला असून लोकांना त्यांनी या विरोधात एकजुटीने लढण्याचे आवाहन केले आहे. या कोलंबी प्रकल्पासाठी झालेल्या भरावामुळे परिसरातील पाच आदिवासी पाडे उद्ध्वस्त होणार असल्याची भीती त्यांनी व्यक्त केली, तर पावसाळ्यात भुईगाव आणि गिरीज या संपूर्ण पट्टय़ात पूरसदृश परिस्थिती निर्माण होणार असल्याचे त्यांनी सांगितले. मातीभरावामुळे बांध तोडण्यात आला आहे. त्यामुळे समुद्राचे पाणी शेतात शिरणार आहे. याशिवाय परिसरातील सर्व शेतीत पाणी जाऊन शेती उद्ध्वस्त होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

हजारो वर्षांपासून हा हरित पट्टा येथील जनतेने आणि शासनाने जपला आहे. पर्यावरण संतुलनासाठी तो उपयुक्त आहे; परंतु हा हरित पट्टा नष्ट होत असून वसईकरांनी सर्व शक्तीनिशी एकजुटीने या विरोधात उभे राहावे.

– फादर फ्रान्सिस दिब्रिटो, सामाजिक कार्यकर्ते

हा कोलंबी प्रकल्प पश्चिम पट्टय़ातील बागायती शेतीला विनाशकारी ठरणार आहे. हा भाग जलमय होणार असून आदिवासी पाडेही उद्ध्वस्त होणार आहेत.

– सायमन मार्टिन, सामाजिक कार्यकर्ते

माती भराव आणि तिवरांची झाडे कापल्याप्रकरणी आम्ही मेहेर यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या संबंधी पुढील तपास चालू असून योग्य ती कारवाई केली जाईल

– गजेंद्र पाटोळे, तहसीलदार, वसई

या विनाशाला स्थानिक नागरिकही तेवढेच जबाबदार आहेत. वसईच्या या हरित पट्टय़ात टोलेजंग इमारती उभ्या राहण्यास सुरुवात झाली आहे. बिल्डरांना जमिनी कोण विकते आणि एवढय़ा मोठय़ा प्रमाणात जमिनी का विकल्या जात आहेत?

– मार्कुस डाबरे, अध्यक्ष, हरित वसई संरक्षण समिती

21

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

  • Tags: vasai,
  • Just Now!
    X