मुंबई, ठाणे, कल्याण, पनवेलचा ‘एमएमआरडीए’च्या ‘भविष्यवेध’ प्रकल्पात समावेश

मुंबई, ठाणे, कल्याण, पनवेल परिसरांतील नागरीकरणाचा वेग पाहता या भागातील जैवसृष्टी आणि हिरवाई मोठय़ा प्रमाणावर नष्ट होत आहे. नागरीकरणाबरोबर शहरवासीयांना मोकळ्या वातावरणात राहण्याचा आनंद मिळावा म्हणून शहरांच्या परिसरातील नद्यांच्या परिसरात ‘हरित मार्गिका’ विकसित करण्याचा निर्णय ‘मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा’ने घेतला आहे. याशिवाय अस्तित्वात असलेली अभयारण्ये आणि राष्ट्रीय उद्यानांचे अधिकाधिक संवर्धन करून तेथे अधिकाधिक वृक्षारोपण करण्याचा विचार या प्रस्तावात नियोजनकारांनी केले आहे.

नद्यांच्या काठावरचा मोकळा भूभाग निश्चित करून तेथे मोठय़ा प्रमाणात वनराई फुलवायची. अस्तित्वामधील झाडा, झुडपांचे संगोपन करायचे. या ठिकाणी ये-जा करण्यासाठी मुख्य रस्त्यापासून फक्त एक सायकल मार्ग अस्तित्वात ठेवायचा, असा विचार या प्रस्तावात केला आहे. ‘एमएमआरडीए’च्या २०१६ ते २०३६ या ‘भविष्यवेध’ प्रकल्पांतर्गत या हरित मार्गिकेचा (ग्रीन कॉरिडॉर) विकास होणार आहे. शहरांचे नागरीकरण होताना प्रदूषणाचा त्रास होऊ नये, विकास नियंत्रण नियमावलीचे पालन व्हावे, झालरपट्टी (बफर) अबाधित राहावी, जैवसृष्टीचे (बायोडाव्‍‌र्हसिटी) संवर्धन व्हावे, हा या प्रकल्पा मागचा उद्देश आहे.

मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, पारसिक टेकडय़ा, गणेशपुरी जवळील तुंगारेश्वरचे जंगल, माथेरानच्या टेकडय़ा, कर्नाळा पक्षी अभयारण्य, कनकेश्वर, सागरगड ही निसर्गत: फुललेली जंगले आहेत. या निबीड जंगलाच्या परिसरात मोकळ्या सरकारी जमिनींचा शोध घेऊन तेथे सामाजिक वनीकरण, खासगी माध्यमांतून वृक्षारोपणाचे कार्यक्रम राबवून वनराई फुलविण्याचा मानस प्रस्तावात व्यक्त केला आहे. उल्हास नदी, भातसई, कामवडी, बारवी, काळू या नद्यांकाठी हा हरित प्रकल्प राबविला जाणार आहे.

नदीकाठची ही हिरवाईने बहरलेली ठिकाणे पर्यटन स्थळाची ठिकाणे म्हणून विकसित करायची. या भागात ऐतिहासिक, वारसा वास्तू असतील तर त्या ठिकाणांचे महत्त्व ओळखून ‘हरित मार्गिका’ त्या ठिकाणांना रस्ते मार्गाने जोडायचा. आणि स्थानिक पातळीवर पर्यटन रोजगाराच्या संधी उपलब्ध करायच्या, असा विचार प्रस्तावात करण्यात आला आहे. उल्हास नदी बदलापूर, अंबरनाथ, कल्याण, उल्हासनगर, मीरा-भाइंदर भागातून वाहते. वालधुनी नदीचा काही भाग कल्याणमधून वाहतो. रायगडमध्ये पाताळगंगा, गढी नदीचा विचार करण्यात आला आहे. या नद्यांकाठचे मोकळे भाग हरित मार्गिकांसाठी निश्चित करून तेथे पर्यटन स्थळांसारखी ठिकाणे विकसित होणार आहेत, असे सूत्राने सांगितले.

प्रस्तावित जोडरस्ते

राखीव जंगल, नद्यांकाठचे हरित पट्टे वाहतुकीच्या माध्यमातून एकमेकांशी संलग्न असावेत म्हणून उल्हास नदीकाठचा रस्ता ते मीरा-भाइंदर, अर्नाळा-आगाशी ते वज्रेश्वरी, वसई किल्ला ते सोपारा स्तुप, जुन्या पुणे मुंबई महामार्गाने पनवेल ते खोपोली हे या रस्ते मार्गाने जोडले जाणार आहेत. त्याचबरोबर वज्रेश्वरी येथील गरम पाण्याची कुंड, अंबरनाथचे शिवमंदिर, वसई विरारचा किल्ला, दुर्गाडी किल्ला, मलंगगड, माथेरानचा प्रबळगड, लोनाडच्या गुहा ही ऐतिहासिक, पुरातन वारशाची ठिकाणे हरित मार्गिकेने एकमेकांशी जोडण्याचा विचार प्रस्तावात आहे.