परंतु ‘त्या’ विक्रेत्यावरचा गुन्हा अद्यापही मागे नाही

भाईंदर : मीरा-भाईंदर शहरात १० दिवसांकरिता करण्यात आलेल्या टाळेबंदी नियमातून वृत्तपत्रे विक्रेत्यांच्या स्टॉलला वगळण्यात आल्याचे आदेश पालिका आयुक्त डॉ. विजय राठोड यांनी दिले आहेत. विशेष म्हणजे ‘त्या’  वृत्तपत्र विक्रेत्यांवरून हा गोंधळ निर्माण झाला होता त्यावरील गुन्हा अद्यापही मागे घेण्यात आलेला नाही.

मीरा-भाईंदर मधील रुग्णसंख्येत झपाटय़ाने वाढ होत असल्यामुळे १ जुलै ते १०जुलैपर्यंत पूर्णत: टाळेबंदीचा नियम लागु करण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. परंतु ५ जुलै रोजी भाईंदर पश्चिमेकडील पालिका प्रवेशद्वाराबाजूला वर्तमानपत्राची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर गर्दीचे कारण देत भाईंदर पश्चिम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यामुळे शहरातील पत्रकार आणि सामाजिक कार्यकत्यांकडून याविषयी तीव्र संतापाची लाट पसरली होती. त्याचप्रकारे टाळेबंदी काळात वृत्तपत्र विक्री करणाऱ्यांना परवानगी देण्याची मागणी करण्यात आली होती. अखेर आता वृत्तपत्र विक्रीकरिता सकाळी ७ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत परवानगी देण्यात आली आहे. परंतु वृत्तपत्र विक्रेत्यांवर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याविषयी अद्यापही निर्णय न झाल्यामुळे संभ्रम निर्माण झाला आहे.