बदलत्या हवामानामुळे उत्पादन घटल्याचे निमित्त
परतीच्या पावसाने दिलेल्या फटक्यामुळे कांद्याच्या दरांनी उचल खाल्ली असतानाच टोमॅटोचाही भाव वधारू लागला आहे. मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईच्या किरकोळ बाजारात उत्तम प्रतीच्या टॉमेटोचे दर किलोमागे साठ रुपयांवर पोहोचल्याचे दिसून येत आहेत. शुक्रवापर्यंत घाऊक बाजारात ३४ ते ३८ रुपये प्रतिकिलो दराने विकल्या जाणाऱ्या टोमॅटोचे दर मंगळवारी ४४ रुपये प्रतिकिलोवर पोहोचले होते. उत्तर तसेच पश्चिम महाराष्ट्रातील बदलत्या हवामानाचा फटका टोमॅटोच्या पिकाला बसल्याने टोमॅटो महाग झाल्याचे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील व्यापाऱ्यांनी म्हटले आहे. त्यामुळे येते काही दिवस टोमॅटोसाठी ग्राहकांच्या खिशाला अधिक कात्री लागण्याची शक्यता आहे.
वाशीतील घाऊक बाजारातून मुंबई, ठाणे तसेच नवी मुंबईच्या बाजारपेठेत कृषी मालाची आवक होत असते. गेल्या पंधरवडय़ापासून सातारा, सांगली तसेच पुणे जिल्ह्य़ातील काही भागांमधून वाशी बाजारात येणाऱ्या टॉमेटोची आवक कमालीची घटली आहे. कर्नाटक राज्यातील बंगळूरू भागातूनही टोमॅटोची मोठी आवक होत असते. एरवी वाशीच्या बाजारात साधारणपणे ६० ते ७० गाडी इतकी टोमॅटोची आवक होत असते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून हे प्रमाण पन्नाशीच्या आसपास आल्याने टोमॅटोचे घाऊक आणि किरकोळ असे दोन्ही दर वाढू लागले आहे, अशी माहिती ठाण्यातील भाजी विक्रते रवी कुर्डेकर यांनी सांगितले. याची कुणकुण किरकोळ बाजारात लागल्यानंतर अनेक विक्रेत्यांनी ६० ते ८० रुपये प्रतिकिलो दराने टोमॅटोची विक्री सुरू केली आहे. दिवाळीच्या निमित्ताने दोन दिवस कृषी उत्त्पन्न बाजार समिती बंद असल्यामुळे किरकोळ बाजारातील भाज्यांचे दर काही प्रमाणात वाढले आहेत. टोमॅटोबरोबरच भेंडी, शिमला मिरची यासारख्या भाज्या महाग झाल्या आहेत, अशी माहिती स्थानिक विक्रेत्यांनी दिली.
आधी कांदा मग डाळ आणि आता टोमॅटो. जर सतत अशी दरवाढ होत राहिली तर आम्ही सामान्य माणसावर उपोषण करण्याची वेळ येईल. प्रशासनाने जिवनावश्यक वस्तूंच्या किमतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी योग्य ती पावले उचलायला हवीत.
– प्रांजली पवार, ठाणे