साहित्य संमेलनासाठी सावळाराम महाराज क्रीडासंकुलामध्ये साहित्यनगरी उभारताना येथील मैदानाची नासधूस केली आहे. क्रीडा संकुलाची संरक्षक भिंत आणि पदपथाचे कठडे तोडण्यात आले आहेत. यासोबतच लांब व उंच उडीचे मैदानही नष्ट करण्यात आले आहे. क्रिकेटची खेळपट्टीही उखडण्यात आली आहे. त्यामुळे खेळाडूंमध्ये नाराजी आहे. साहित्य संमेलन संपल्यानंतर क्रीडासंकुलाची डागडुजी पालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येईल, असे पालिकेतील विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.

डोंबिवलीत फारशी मैदाने आणि क्रीडांगणे नाहीत. सावळाराम महाराज क्रीडासंकुल हे सर्वात मोठे मैदान आहे. शहरातील इतर मैदाने छोटी आणि अपुरी आहेत. त्यामुळे अनेक खेळाडू येथे सराव करण्यासाठी येतात. मुख्य मैदानाच्या एका कोपऱ्यात क्रिकेटच्या दोन खेळपट्टय़ा तयार करण्यात आल्या आहेत. त्याच्याच बाजूला लांब व उंच उडीची खेळपट्टी तयार करण्यात आली आहे. या खेळपट्टीच्या ठिकाणी प्रमुख अतिथींच्या जेवणाची सोय करण्यात येणार असल्याने ही खेळपट्टी नष्ट करण्यात आली आहे. येथे भुसभुशीत असलेला मातीचा खड्डा हा विटांच्या तुकडय़ांनी बुजविण्यात आला आहे. तसेच या ठिकाणी असलेला चौथराही तोडण्यात आला आहे. यामुळे क्रीडाप्रेमींमध्ये नाराजीचे वातावरण आहे. तीन दिवस साहित्य संमेलन आहे. त्यानंतर पालिका प्रशासन या मैदानाकडे ढुंकूनही पाहणार नाही. ही खेळपट्टी त्यांनी आज तोडून टाकली आहे, ती नंतर दुरुस्त करून देणार का? शहरातील मैदाने ही खेळासाठी आहेत की कार्यक्रमांसाठी असा सवाल क्रीडाप्रेमी राजन पाटील यांनी केला. गेले काही दिवस या संकुलात साहित्य संमेलन सभामंडप उभारणीचे काम सुरूआहे. त्यामुळे सराव बंद आहे. त्यात संमेलनाच्या निमित्ताने मैदानाची अशी नासधूस केली गेली तर आम्ही सराव कुठे करायचा असा सवाल ज्योती पांचाळ यांनी उपस्थित केला आहे.

मुख्य मंडपाच्या पाठीमागे अतिथींच्या जेवणाची सोय करण्यात आली आहे. त्यामुळे तो भाग सपाट करण्यात आला आहे. साहित्य संमेलन संपल्यानंतर पालिका प्रशासनाच्या वतीने ज्या ठिकाणी तोडफोड करण्यात आली आहे, त्या कामाची डागडुजी करणार आहे.

सुभाष पाटील, कार्यकारी अभियंता, डोंबिवली.