|| भगवान मंडलिक

सनदीऐवजी मुख्याधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यासाठी मोर्चेबांधणी

कल्याण : कल्याण-डोंबिवली शहरांचा गाडा हाकण्यासाठी महापालिकेच्या आयुक्तपदी सनदी अधिकाऱ्याची नियुक्ती करावी, असा सुजाण नागरिकांचा आग्रह असताना ठाणे जिल्ह्य़ाचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्याधिकारी संवर्गातील गणेश देशमुख यांची नियुक्ती करण्याची शिफारस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

करोना रुग्णांची संख्या वाढू लागल्याने वर्षभरापूर्वी राज्य सरकारने जिल्ह्य़ातील प्रमुख महापालिकांमधील प्रशासकीय प्रमुखांच्या बदल्या करताना नव्या दमाच्या आणि वैद्यकीय पार्श्वभूमी   असलेल्या अधिकाऱ्यांची नियुक्ती केली होती. त्यानंतरही कल्याण-डोंबिवलीत विद्यमान आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांना शिंदे यांच्या आग्रहामुळे अभय मिळाले होते. करोनाच्या उद्रेकाने पुन्हा चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली असताना पालकमंत्र्यांनी सनदी सेवेतील सूर्यवंशी यांच्या जागी मुख्याधिकारी संवर्गातील देशमुख यांच्यासाठी आग्रह धरला आहे.  गणेश देशमुख यांनी त्यांनी नांदेड, पनवेल येथे आयुक्त म्हणून उत्कृष्ट काम केले आहे, असा शिंदे यांचा दावा आहे. गेले वर्षभर महापालिकांमधील वेगवेगळ्या नियुक्त्यांमध्ये मुख्याधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांची चलती असल्याची चर्चा आहे. अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त, साहाय्यक आयुक्त यांसारख्या नियुक्त्यांमध्ये मुख्याधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांनाच प्रधान्य दिले जात असल्याच्या तक्रारी दबक्या आवाजात पुढे येऊ लागल्या आहेत.

गणेश देशमुख सध्या ठाणे महापालिकेत अतिरिक्त आयुक्तपदी कार्यरत आहेत. मुख्याधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांचा एक विशिष्ट गट राज्यभरातील बदल्यांमध्ये अग्रेसर असल्याचा आरोप मध्यंतरी ठाणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी केला होता. त्या वेळी देशमुख यांच्या कार्यपद्धतीबद्दल प्रश्नचिन्हही उपस्थित करण्यात आले होते. या पार्श्वभूमी  वर पालकमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून कल्याण-डोंबिवलीत देशमुख यांच्या नियुक्तीचा आग्रह धरल्याने या पत्रप्रपंचामागील बोलविता धनी कोण, अशी कुजबुज सुरू झाली आहे.

 

सूर्यवंशी नावडते का झाले?

कल्याण-डोंबिवली पालिका ‘क’ श्रेणीत आहे. ‘क’ वर्ग पालिकेत भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) अधिकारीच आयुक्त म्हणून येऊ शकतो, असे शासनाचे स्पष्ट निर्देश आहेत. तरीही पालकमंत्री शिंदे यांनी या शासकीय आदेशाकडे दुर्लक्ष करून मुख्याधिकारी श्रेणीतील देशमुख यांना पालिकेत आयुक्त म्हणून आणण्याच्या प्रयत्नाविषयी आश्चर्य व्यक्त केले जात आहे. कल्याण-डोंबिवली पालिकेची निवडणूक लवकरच होणार आहे. पालिकेत अनेक वर्षे शिवसेनेची भाजपच्या साथीने सत्ता आहे. ती अबाधित राखण्यासाठी शिवसेनेला मर्जी राखणारा आयुक्त हवा आहे. म्हणूनच मुख्याधिकारी संवर्गातील अधिकाऱ्याला आयुक्त म्हणून नेमण्याचा घाट घातला जात असल्याचे सांगण्यात येते.

दरम्यान, पालकमंत्री शिंदे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करूनही ते प्रतिक्रियेसाठी उपलब्ध होऊ शकले नाहीत. प्रतिक्रियेसाठी अतिरिक्त आयुक्त गणेश देशमुख यांच्याशी संपर्क केला असता ते व्यग्र असल्याचे सांगण्यात आले.

 

..तर न्यायालयात आव्हान!

गेल्या सात वर्षांत कल्याण-डोंबिवलीत नियुक्त केलेल्या एकाही सनदी अधिकाऱ्याने आयुक्तपदाचा तीन वर्षांचा कालावधी पूर्ण केलेला नाही. काही कठोर शिस्तीच्या आयुक्तांना येथील राजकीय मंडळींनी पद सोडण्यास भाग पाडले. अशा परिस्थितीत पालिकेत पुन्हा मुख्याधिकारी संवर्गातील गणेश देशमुख यांना आणण्याच्या हालचाली सुरू आहेत. क वर्ग पालिकेत मुख्याधिकारी श्रेणीतील अधिकारी आयुक्त म्हणून येऊ शकत नाही. त्यामुळे देशमुख यांची आयुक्त म्हणून बदली केली तर त्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिले जाईल, असे निवेदन माहिती अधिकार कार्यकर्ते कौस्तुभ गोखले यांनी मुख्य सचिवांना गेल्या महिन्यात दिले आहे.

 

देशमुख यांच्याविरुद्ध तक्रार

देशमुख यापूर्वी कल्याण-डोंबिवली महापालिकेत उपायुक्त म्हणून कार्यरत होते. मुक्त जमीन कर प्रकरणात त्यांच्याविरुद्ध कर विभागातील एक तत्कालीन महिला अधिकाऱ्याने शासनाकडे तक्रार केली होती, असे माहिती अधिकार कार्यकर्ते कौस्तुभ गोखले यांनी मुख्य सचिवांकडे केलेल्या तक्रारीत म्हटले आहे. देशमुख यांची सहा ते सात वर्षांत विहित कालावधी पूर्ण न होता मिरा -भाईंदर, अंबरनाथ, नांदेड वाघेळा, पनवेल आणि ठाणे पालिका येथे बदली करण्यात आली आहे. एका अधिकाऱ्याच्या एवढय़ा बदल्या होण्यामागील कारण काय याचीही चौकशी शासनाने करावी, अशी मागणीही गोखले यांनी केली आहे.