News Flash

Gudi Padwa 2017 : पारंपरिक उत्सवातून नवविचारांना प्रेरणा!

अंगणवाडीच्या महिलांनी स्वागतयात्रेत केलेले नृत्य विशेष आकर्षण ठरले.

ठाणे तसेच कल्याण-डोंबिवली शहरांमध्ये मंगळवारी भारतीय नववर्षांनिमित्त काढण्यात आलेल्या स्वागतयात्रांमध्ये तरुणवर्ग आणि महिलांचा सहभाग लक्षणीय होता. (छायाचित्र: दीपक जोशी, गणेश जाधव)

* ठाणे, कल्याण, डोंबिवलीतील नववर्ष स्वागतयात्रा उत्साहात *  सांस्कृतिक स्नेहमीलनासोबत सामाजिक प्रगतीचाही संदेश

ढोल-ताशांचा गजर, पारंपरिक वेशभूषेतील नागरिक, दुचाकीवर स्वार झालेल्या महिला, भगवे झेंडे-पताका, टाळ-मृदुंगाचा ताल आणि लेझीमच्या कवायती हे दर वर्षी नववर्ष स्वागतयात्रातून दिसणारे चित्र यंदाही ठाणे, कल्याण, डोंबिवली आणि आसपासच्या शहरांमध्ये मंगळवारी, गुढी पाडव्याच्या दिवशी दिसून आले. मात्र, वर्षांनुवर्षांची ही परंपरा जपतानाच यंदा या यात्रांच्या माध्यमातून जनमानसात नवे विचार रुजवण्याचा प्रयत्नही यंदा ठळकपणे दिसून आला. विविध प्रकारचे सामाजिक संदेश देणारे चित्ररथ आणि देखाव्यांच्या माध्यमातून यंदाच्या स्वागतयात्रांत रोकडविरहित व्यवहारांपासून जलसंवर्धनापर्यंत आणि ‘स्मार्ट’ शहरापासून ‘बेटी बचाओ’ मोहिमेपर्यंतच्या मुद्दय़ांवर जागर करण्यात आला.

सोळा वर्षांची परंपरा असलेल्या श्री कौपिनेश्वर सांस्कृतिक न्यासच्या स्वागतयात्रेत ठाणे परिसरातील विविध संस्थांचे चित्ररथ सहभागी झाले होते. डोंबिवलीतील श्री गणेश मंदिर संस्थानने गुढीपाडव्यानिमित्त निघणाऱ्या स्वागतयात्रेचे १९ वे वर्ष साजरे केले. डोंबिवलीतील स्वागतयात्रेत यंदा स्मार्ट डोंबिवलीचा आराखडा असलेले चित्ररथ सहभागी झालेले असल्याने स्वागतयात्रा विशेष आकर्षण ठरली. हिंदू-मुस्लीम एकत्रितरीत्या सहभागी झाले असल्याने हिंदू-मुस्लीम ऐक्य डोंबिवलीतील स्वागतयात्रेत पाहायला मिळाले.

ठाण्यातील श्रीकौपिनेश्वर मंदिरातून प्रारंभ झालेल्या या स्वागतयात्रेत तरुणांसह ज्येष्ठ मंडळी उत्साहात सहभागी झाली होती. विष्णू नगर, गोखले रोड, राम मारुती पथ या ठिकाणी सकाळी उत्साहाचे वातावरण होते. ठाणे शहरातील श्रीनगर, सावरकरनगर, कोपरी, ब्रह्मांड, कळवा या परिसरातून उपयात्रा काढण्यात आल्या. त्यामुळे सारे शहर उत्साहाने भारून गेले. मंगळवारी सकाळी तलावपाळीजवळील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केल्यावर श्रीकौपिनेश्वर मंदिरातून पालखी निघाली. चिंतामणी चौकात पालखी आल्यावर टाळ गजराच्या नादात पुष्पवृष्टी करण्यात आली. मराठी शाळा वाचवा, पाणी वाचवा, इंधन वाचवा असे संदेशपर फलक चित्ररथांना लावण्यात आले होते. जांभळीनाका, तलावपाळी या ठिकाणी स्वागतयात्रेत चित्ररथ सहभागी झाले.

घंटाळी आणि विष्णूनगरच्या चौकातील ढोल-ताशांच्या ढणढणाटासोबत या वेळी लेझीम पथक, भजन मंडळी अशा पारंपरिक कलाही सादर करण्यात आल्या. ‘सर्जिकल स्ट्राइक’सारख्या महत्त्वाच्या घटनेची छाप यंदा स्वागतयात्रेमध्ये पाहायला मिळाली. सायकलफेरीद्वारे इंधनबचतीचा संदेश, दुचाकींवर स्वार झालेल्या महिलांची ‘बेटी बचाओ’ची हाक, व्यसनमुक्ती, अवयवदान, योगाभ्यास अशा विषयांवरही प्रबोधन करण्याची संधी सामाजिक संस्थांनी स्वागतयात्रेच्या निमित्ताने साधली. महाराष्ट्र परिवहन महामंडळाचा चित्ररथ, महापालिकेची परिवहनसेवा, अग्निशमन दल, पाणी विभाग, पर्यावरण विभाग, घनकचरा विभाग, नौपाडा पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणारे पोलीस मित्र आदी विभागांचे चित्ररथ यंदा पाहायला मिळाले.

‘बानुबया’ ते आसामी नृत्य

अंगणवाडीच्या महिलांनी स्वागतयात्रेत केलेले नृत्य विशेष आकर्षण ठरले. पारंपरिक वेशभूषा करून, फेटे परिधान करत या महिलांनी बानुबया, आवाज वाढव डीजे अशा गाण्यांवर नृत्य सादर केले. मराठमोळ्या स्वागतयात्रेत सर्वधर्मीयांचा समावेश असल्याने आसाममधील संस्कृतीचे सादरीकरण स्वागतयात्रेत करण्यात आले होते. महिलांनी आसाम संस्कृतीप्रमाणे पारंपरिक वेशभूषा करत स्वागतयात्रेत नृत्य सादर केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 29, 2017 3:27 am

Web Title: gudi padwa 2017 celebrated with procession and social messages in thane district
Next Stories
1 Gudi Padwa २०१७ : अमेरिकेत ‘त्या’ दोघींनी उभारली नव्या संकल्पनेची गुढी
2 gudi padwa 2017 : मुहूर्तावरील खरेदीसाठी बाजारपेठा सज्ज
3 पाडव्याच्या मुहुर्तावर आमरसाचा बेत अधुरा
Just Now!
X