News Flash

परंपरा नि संस्कृतीचे दर्शन

वसईत मोठय़ा धूमधडाक्यात हिंदू नववर्ष दिन म्हणजेच गुढीपाडवा साजरा झाला.

वसईत मोठय़ा धूमधडाक्यात हिंदू नववर्ष दिन म्हणजेच गुढीपाडवा साजरा झाला.

पारंपरिक वेशभूषेत रस्त्यावर उतरलेली तरुणाई, ढोल, ताशांच्या गजरात थिरकणारी पावले, ऐतिहासिक प्रसंग दाखविणारी शोभायात्रा, साहसी खेळांचे प्रात्यक्षिके, नऊवारी साडय़ा नेसून दुचाकीवर निघालेल्या महिला, विविध कलाविष्कारांची जुगलबंदी.. वसईत मोठय़ा धूमधडाक्यात हिंदू नववर्ष दिन म्हणजेच गुढीपाडवा साजरा झाला. मराठी संस्कृती आणि परंपरेचे दर्शन यानिमित्ताने वसईकरांना घडले.
वसई पारनाका, खोचिवडे, उमेळे, वासळई, दरपाळे या भागांमध्ये स्वागतयात्रा उत्स्फूर्तपणे दिसून येत होत्या. नालासोपारा गाव ते वसई किल्ल्यातील नरवीर चिमाजी अप्पा स्मारकापर्यंत महिलांची स्वागतयात्रा काढण्यात आली होती. ढोलताशांचा कडकडाट, लेझीमचा सूर आणि दणकेबाज नृत्याच्या तालात अनेक ठिकाणी स्वागतयात्रा निघाल्या होत्या. चित्तथरारक तलवारबाजी, दांडपट्टा, भाले, काठय़ांच्या कसरतींचे प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. पारंपरिक वेशभूषेसह लहानग्यांनी पौराणिक, सांस्कृतिक, देव-देवतांच्या छबी सादर केल्या. घोडे, बैलगाडय़ा यांनी यात्रेची शोभा वाढवली होती. डोक्यावर कलश आणि तुळस घेऊन आलेल्या महिला सर्वाचे लक्ष वेधून घेत होत्या. खोचीवडे गावातील युवा मित्र मंडळ यांच्या वतीने आयोजित स्वागतयात्रेत ‘पाण्याचा अपव्यय टाळा’ या सामाजिक विषयावर आधारित संदेश देण्यात आला. ‘गुढीपाडवा नववर्ष स्वागतयात्रा समिती’च्या स्वागतयात्रेत पारंपरिक वेशभूषा स्पर्धा व नरवीर ढोल-ताशा पथक यांचे विशेष आकर्षण पाहावयास मिळाले.

वसईच्या रस्त्यावर २२५ नवी वाहने
सराफांच्या संपामुळे पाडव्याच्या शुभमुहूर्तावर ग्राहकांना सोने खरेदी करता आले नसले तरी नव्या वाहनांची मात्र यंदा चांगलीच खरेदी झाली आहे. विरार येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात तब्बल २२५ नव्या वाहनांची नोंदणी करण्यात आली. त्यात १८९ मोटारसायकली, सहा कार आणि २४ इतर वाहनांचा समावेश आहे. या वाहनांच्या नोंदणी शुल्क, कर आदीतून तब्बल ३० लाख १५ हजार रुपयांचा महसूल परिवहन खात्याला मिळाला आहे. गुढीपाडव्याला लोक नव्या वाहनांची नोंदणी करतात. त्यामुळे सुटीच्या दिवशीही परिवहन कार्यालय सुरू ठेवण्यात आले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 9, 2016 3:00 am

Web Title: gudi padwa celebrated in vasai
Next Stories
1 ‘रेन हार्वेस्टिंग’बाबत वसईकर उदासीन
2 सराफांचा संघर्ष वसईत शिगेला गुढीपाडव्याला दुकाने उघडण्यास मनाई
3 मालमत्ता कर वसुलीत विक्रमी वाढ
Just Now!
X