सांस्कृतिक शहर म्हणून नावारूपाला येत असलेल्या बदलापूर शहरात गुढी पाडव्यानिमित्त नववर्ष स्वागतयात्रेत सामाजिक संदेशांसह धर्माची महती सांगितली जाणार आहे. नववर्षांच्या पूर्वसंध्येपर्यंत अनेक कार्यक्रमांची मेजवानी यानिमित्त बदलापूरकरांना मिळणार आहे.
गेल्या तेरा वर्षांपासून नववर्ष स्वागतयात्रेच्या माध्यमातून एक वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या बदलापूर शहरात स्वागतयात्रेतील नावीन्यपूर्ण विषयांबाबत कायम उत्सुकता असते. त्या उत्सुकतेला साजेसे असेच नियोजन हनुमान मारुती देवस्थान आणि नववर्ष स्वागत यात्रा समितीतर्फे करण्यात येते. यंदाही पर्यावरण रक्षण, इंधन बचत, जल संरक्षण, प्रदूषण टाळा असे संदेश देणारे चित्ररथ आणि पथके शोभायात्रेत सहभागी होणार आहेत. त्यासोबतच महिलांचे ढोल पथक, ध्वज पथक, तलवार पथक आणि सायकल पथकही शोभायात्रेत सहभागी होतील.
नववर्ष स्वागताच्या कार्यक्रमांना ६ एप्रिलपासून सुरुवात होणार असून पहिल्या दिवशी अभिनेते शरद पोंक्षे यांचे ‘स्वातंत्र्यवीर सावरकर- एक राष्ट्रीय विचारदर्शन’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. तसेच गुढी पाडव्याच्या पूर्वसंध्येला मुग्ध संगीत या संगीतमय कार्यक्रमाची मेजवानी रसिकांना मिळणार आहे. याच दिवशी दीपोत्सव आणि आवाजविरहित फटाक्यांच्या आतषबाजीसह विविध ढोल पथकांचे सामूहिक ढोलवादन होणार आहे, अशी माहिती श्री हनुमान मारुती देवस्थानचे अध्यक्ष तुषार आपटे यांनी दिली आहे. दरवर्षी संस्थेतर्फे शोभायात्रेच्या दिवशी सामाजिक सेवा पुरस्काराचे वितरण करण्यात येते. यंदाच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त उपस्थित राहणार आहे.

शंकराचार्याच्या चार पीठांवर प्रकाश
अष्टगंध अधात्म व्यासपीठ, दि कल्याण जनता सहकारी बँक आणि डोंबिवली नागरी सहकारी बँक यांच्या संयुक्त विद्यमाने कात्रप भागातून येणाऱ्या उपयात्रेत हिंदू धर्मातील शंकराचार्याची चार पीठे आणि त्यांचे धर्मप्रसाराचे कार्य यावर प्रकाश टाकणाऱ्या देखाव्यांचा समावेश होणार असल्याची माहिती, प्रसिद्धीप्रमुख किरण मिलगीर यांनी दिली आहे.