25 February 2021

News Flash

ठाण्यात गुढीपाडवा स्वागतयात्रेतून मतदार जागृती

पारंपरिक वेशभूषेत नागरिकांचा सहभाग

गुढीपाडव्यानिमित्त डोंबिवलीत आयोजित स्वागतयात्रेत नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.                                       (छाया:दीपक जोशी)

विविध विषयांवर भाष्य करणाऱ्या चित्ररथांचा समावेश; पारंपरिक वेशभूषेत नागरिकांचा सहभाग

पारंपरिक वेशभूषा परिधान करून श्रीकौपिनेश्वर न्यासातर्फे गुढीपाडव्यानिमित्त आयोजित  नववर्ष स्वागतयात्रेत आबालवृद्धांनी सहभागी होत उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शवला.  महापौर मीनाक्षी शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन-पालखीची पूजा करून स्वागतयात्रेस सुरुवात झाली. १८वे वर्ष असणाऱ्या या नववर्ष स्वागत यात्रेत ६० हून अधिक संस्थांनी तसेच समूहांनी चित्ररथांच्या माध्यमांतून मतदान, आरोग्य, पर्यावरण यासारख्या विविध विषयांवर जनजागृती केली.

ठाणेकरांनी मासुंदा तलाव परिसर, गोखले मार्ग आणि राम मारुती रोड या भागात एकत्र येत स्वागत यात्रेत सहभागी होत नववर्षांचे स्वागत केले.  शहरातील विविध भागातील रहिवासी संकुले, शाळा, महाविद्यालये स्वागतयात्रेत सहभागी झाली होती. एसटीप्रेमी समूहातर्फे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यात दाखल झालेली माइल्ड स्टील परिवर्तन ही बसही सहभागी झाली होती. स्वागतयात्रेत पारंपरिक वेशभूषा करून महिला दुचाकीस्वारांनी मोठय़ा संख्येने उपस्थिती दर्शवली. स्वागतयात्रा आणि चित्ररथासाठी अनेक संस्था, शाळा , महाविद्यालयांनी सहभाग घेतला. ठाण्यातील घोडबंदर परिसरातही  नववर्ष स्वागतयात्रा आयोजित करण्यात आल्या होत्या. ठाणे महापालिका मैदानात २०० फुटांची रांगोळी आणि ५० फुटांची गुढी उभारण्यात आली.  ठाणे पूर्वेतील कोपरी गावात विठ्ठल सेवा मंडळ यांच्यातर्फे स्वागतयात्रेचे आयोजन करण्यात आले होते.

राजकीय पक्षांचे शीतपेय, मिठाईवाटप

श्रीकौपिनेश्वर न्यासातर्फे गुढीपाडव्यानिमित्त आयोजित  नववर्ष स्वागत यात्रेत विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनीही उपस्थिती दर्शवली. स्वागत यात्रेत सहभागी झालेल्यांसाठी राजकीय पक्षांकडून शीतपेय, आईस्क्रीम, मिठाई आणि पाण्याचे वाटप यावेळी करण्यात आले. पालकमंत्री एकनाथ शिंदे, सभागृह नेते नरेश म्हस्के, आमदार रवींद्र फाटक, आमदार निरंजन डावखरे, लोकसभेचे शिवसेनेचे उमेदवार राजन विचारे तसेच शिवसेना भाजप पक्षाचे नगरसेवक मोठय़ा संख्येने स्वागतयात्रेत सहभागी झाले होते. राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि ठाणे लोकसभेचे राष्ट्रवादीचे उमेदवार आनंद परांजपे हे देखील माजी खासदार डॉ. संजीव नाईक यांच्यासोबत सहभागी झाले होते.  स्वागतयात्रेच्या मार्गावरील गोखले रस्त्यावर राजकीय पक्षांकडून मंच उभारण्यात आले होते.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 7, 2019 1:21 am

Web Title: gudi padwa celebration in thane
Next Stories
1 जातीवाचक शिवीगाळ केल्याने १५० जणांविरुद्ध अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा
2 ‘शिक्षण हक्का’अंतर्गत जिल्ह्य़ातील जागांत घट
3 Gudi padwa 2019 : ठाण्यात समाजजागृतीची गुढी
Just Now!
X