नववर्ष स्वागतयात्रा न काढण्याचा निर्णय; पाडव्यासाठीच्या निधीतून टंचाईग्रस्त भागाला पाणीपुरवठा
पुरेसे पाणी उपलब्ध होत नसल्याने हाती हंडे, कळशा घेऊन वणवण फिरण्याची वेळ ओढवलेल्या दिवावासीयांचा गुढीपाडवा यंदा कोरडाच जाण्याची चिन्हे आहेत. त्यामुळेच हिंदू नववर्षांनिमित्त दिवा परिसरातून काढण्यात येणारी स्वागतयात्रा यंदा रद्द करण्यात आली आहे. नववर्ष स्वागतयात्रेसाठी म्हणून जमा होणाऱ्या निधीतून टंचाईग्रस्त भागात पाणीपुरवठा करण्याचा निर्णय येथील सर्व सामाजिक संस्थांनी घेतला आहे. त्यामुळे गुढीपाडव्याच्या दिवशी प्रातिनिधिक गुढी उभारून या उपक्रमाचा शुभारंभ केला जाणार असल्याची माहिती ‘मी दिवेकर सामाजिक संस्था’ यांच्याकडून देण्यात आली आहे.
दिवा गावात गुढीपाडव्याच्या दिवशी जल्लोशात स्वागतयात्रा निघते. मात्र, यंदा या स्वागतयात्रेवर टंचाईचे पाणी पडले आहे. दिवा परिसरामध्ये पाणीटंचाईची भीषण परिस्थिती आहे. तरुण, महिलांसह आबालवृद्धांना पाण्यासाठी दाहीदिशा वणवण करावी लागत आहे. त्यामुळे स्वागतयात्रा काढण्यापेक्षा या नागरिकांच्या पाण्यासाठीचे कष्ट दूर करण्याची गरज येथील स्वागतयात्रा आयोजक संस्थेला जाणवली. त्यातूनच स्वागतयात्रा रद्द करण्याचा निर्णय घेऊन संस्थेने परिसराला पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला.
‘मी दिवेकर सामाजिक संस्थे’ने यासाठी पुढाकार घेतला असून या स्वागतयात्रेत सहभागी होणाऱ्या श्री साईबाबा चॅरिटेबल ट्रस्ट, स्वर्गीय उत्तम पाटील शिक्षण संस्था, एस. एम. जी. विद्यामंदिर, गणेश विद्यामंदिर, जीवन विद्या मिशन, योग वेदांत सेवा समिती, श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, नवदुर्गा महिला मंडळ, मराठा वॉरियर्स आदी दिवा परिसरातील अनेक धार्मिक संस्था, मंडळे, शैक्षणिक संस्था यांनी या उपक्रमास पाठिंबा दर्शवला आहे.

पाणीपुरवठा उपक्रमाची औपचारिक सुरुवात..
स्वागत यात्रेस होणारा खर्च टाळून त्याच खर्चात दिव्यातील तीव्र पाणीटंचाई असलेल्या भागात पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. दिव्यातील नागवाडी गावदेवी मंदिर परिसर, कोकणरत्न साबेगाव, मुंब्रा मोसम टॉकिज आणि शिवशक्तीनगर या चार भागामध्ये पाण्याच्या मोठय़ा टाक्या बसवण्यात येणार आहेत. या टाक्यांमध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे पाणी बंद असते त्या दिवशी पाणी भरण्यात येईल. परिसरातील नागरिक येथून पाणी घेऊन वापर करू शकतील, अशी योजना आयोजकांनी आखली आहे. मेआखेपर्यंत प्रत्येक आठवडय़ात या भागात पाणीपुरवठा केला जाणार असल्याची माहिती मी दिवेकर संस्थेच्या वतीने देण्यात आली.