गुजरातमधील राजकोट (पश्चिम) विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणारे भाजपचे नेते व मुख्यमंत्री विजय रुपानी यांच्या पत्नी अंजली यांच्याकडून कल्याण-डोंबिवलीतील नातेवाईकांना येणारे लघुसंदेश येथील राजकीय वर्तुळात भलतेच चर्चेत आहेत. या संदेशांच्या माध्यमातून गुजराती व्यापाऱ्यांना त्या मदतीसाठी आवाहन करीत आहेत. त्यास प्रतिसाद देत कल्याण-डोंबिवली परिसरातील गुजराती व्यापारी, बिल्डर, मतदार गेल्या काही दिवसांपासून राजकोटच्या दिशेने रवाना होत असल्याचे चित्र दिसत आहे.

गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी राजकोट (पश्चिम) मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवीत आहेत. राज्यातील भाजपचे उमेदवार निवडून आणण्याचा भार मुख्यमंत्री म्हणून विजय रुपानी यांच्यावर आहे. मात्र, स्वत: निवडून येणेही त्यांच्यासाठी प्रतिष्ठेचे आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत रुपानी सुमारे २३ हजार ५०० मताधिक्यांनी विजयी झाले होते. रुपानी यांच्यासमोर या वेळी काँग्रेसने तगडा उमेदवार दिल्याची चर्चा आहे. काँग्रेसने या मतदारसंघात आव्हान उभे केल्याने भाजपने रुपानी यांच्या मदतीसाठी मूळच्या राजकोटच्या राज्याराज्यातील मतदारांना साद घालण्यास सुरुवात केली आहे. कल्याण-डोंबिवलीत गेल्या काही दिवसांपासून रुपानी यांच्या पत्नीचे लघुसंदेश नातेवाईक तसेच मूळ मतदारांच्या भ्रमणध्वनीवर धडकू लागल्याने भाजपची ही गुजरात मोहीम औत्सुक्याचा विषय ठरली आहे.

प्रचारमाटे आवो!

मूळ राजकोटच्या, मात्र आता वेगवेगळय़ा राज्यांत राहणाऱ्या नागरिकांशी अंजली यांनी संपर्क साधण्यास सुरुवात केली आहे. ‘प्रचारमाटे आवो’, अशी साद त्यांनी डोंबिवलीतील गुजराती समाजाच्या विकासक, व्यापारी, व्यावसायिकांना घातली आहे. मुख्यमंत्र्यांच्या पत्नीच्या या आवाहनाला प्रतिसाद देत डोंबिवलीतील काही व्यावसायिकांनी गुजरात गाठले आहे. गुजरातमधील व्यापाऱ्यांमध्ये असलेल्या नाराजीचा फटका बसू नये, यासाठी  रुपानी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहेत.