माजी विद्यार्थी कृतज्ञता व्यक्त करणार ; वाढदिवसावेळी आयोजन

महाराष्ट्र विद्यालयाचे मुख्याध्यापक आणि शिक्षणतज्ज्ञ दत्तात्रय मेहेंदळे यांना २१ फेब्रुवारी २०१६ रोजी ८० वर्षे पूर्ण होत असून माजी विद्यार्थ्यांनी मेहेंदळे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा गौरव करण्याचे ठरवले आहे. पितांबरी प्रॉडक्ट्स प्रा. लि. व्यवस्थापकीय संचालक रवींद्र प्रभुदेसाई, निवेदिका समीरा गुजर, माजी महापौर अशोक राऊळ यांना मेहंदळे यांनी मार्गदर्शन केलेले आहे. या विद्यार्थ्यांच्या वतीने २१ फेब्रुवारी रोजी गडकरी रंगायतनमध्ये सकाळी १० ते १ या वेळात त्यांच्या गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. ८० व्या वाढदिवसानिमित्त सर्व विद्यार्थ्यांकडून कृतज्ञता निधी जमा करण्यात येणार असून योगाचार्य अण्णा व्यवहारे यांच्या हस्ते मेहेंदळे यांचा गौरव करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र विद्यालयाच्या स्थापनेपासून सलग तीस वर्षे म्हणजे १९६३ पासून १९९३ या काळात दत्तात्रय मेहेंदळे विद्यालयाचे मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होते. महाराष्ट्रातील मान्यवर शिक्षणतज्ज्ञ म्हणून ते विख्यात असून अनेक मान्यवर मंडळी त्यांच्या मार्गदर्शनाखाली घडली. शिस्तबद्ध मुख्याध्यापक अशी मेहेंदळे यांची ख्याती असून इंग्रजी विषयावर त्यांचे प्रभुत्व आहे. महाराष्ट्रातील अनेक शाळांमध्ये विद्यार्थी आणि शिक्षकांना त्यांनी मार्गदर्शन केले आहे. मुख्याध्यापक म्हणून काम करताना तीस वर्षांमध्ये आलेल्या अनुभवांचा लाभ शिक्षण क्षेत्रात येणाऱ्या नवोदितांना व्हावा याकरिता ‘विद्यालय व्यवस्थापन’ हे अत्यंत माहितीपूर्ण पुस्तकाचे लिखाण त्यांनी केले आहे. ठाणे जिल्हय़ातर्फे व महाराष्ट्र शासनाच्या वतीने दिला जाणारा ‘आदर्श शिक्षण पुरस्कार’, ठाणे महापालिकेच्या वतीने दिला जाणारा ‘ठाणेभूषण पुरस्कार’, ‘ठाणे गौरव पुरस्कार’, ‘जनकवी पी. सावळाराम स्मृती पुरस्कार’ अशा विविध पुरस्काराचे मेहेंदळे यांना सन्मानित करण्यात आले आहे.

माजी विद्यार्थ्यांकडून देण्यात येणारा कृतज्ञता निधी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना देण्याची इच्छा मेहेंदळे यांची व्यक्त केली आहे. शेतकऱ्याच्या कुटुंबाकरिता स्थापन केलेल्या नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांच्या ‘नाम फाउंडेशन’ला हा निधी कार्यक्रमात अपर्ण करण्याचा मेहेंदळे यांचा मानस आहे. या कार्यक्रमाच्या पूर्वतयारीकरिता माजी विद्यार्थ्यांची बैठक ४ जानेवारी रोजी पितांबरी प्रॉडक्टस प्रा.लि. च्या कार्यालयात सायंकाळी ७ वाजता होणार आहे. महाराष्ट्र विद्यालयातून १९७७ ते १९९३ या कालावधीत दहावी उत्तीर्ण झालेल्या प्रत्येक बॅचमधील किमान दोन विद्यार्थ्यांनी बैठकीस उपस्थित राहण्याचे आवाहन गौरव समितीकडून करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी उदय आगाशे – ९८६९७३०८०२, विलास जोशी – ९८२००१७७४३ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन गुरुवर्य द. म. मेहेंदळे गौरव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.