लुसलुशीत पाव, निरनिराळ्या प्रकारचे चीज, विभिन्न चवींचे सॉसेस आणि दरवळणारा खमंग सुगंध असा माहोल असणारे आणि पाश्चिमात्य पदार्थ मिळणारे कॉर्नर सध्या बरेच लोकप्रिय आहेत. सध्या श्रावण महिना सुरू असल्याने घरी गोडधोड खाऊन खवय्यांची जिव्हा तृप्त झाली असली तरी काहीतरी चटपटीत आणि पाश्चिमात्य पदार्थाची चव चाखण्यासाठी खवय्ये नेहमीच आतुरलेले असतात. काही जण घरात श्रावण पाळत असले तरी बाहेर मांसाहार करीत असतात. डोंबिवली पूर्व विभागातील ‘गुस्तो पिझ्झोरिया’मध्ये सध्या अशाच खवय्यांची गर्दी दिसते.

पोटपूजा हा असा एक धर्म आहे की ज्याला कोणताही मुहूर्त लागत नाही. भूक लागली, एखादा विशिष्ट पदार्थ खाण्याची इच्छा झाली की खवय्यांचे पाय आपसूक तो मिळणाऱ्या कॉर्नरकडे वळतात. ‘गुस्तो पिझ्झोरिया’मध्ये असे अनेक पदार्थ उपलब्ध आहेत. अन्न हे पूर्णब्रह्म मानून श्रावण महिन्यातही मांसाहार करावासा वाटणाऱ्यांसाठी इथे अनेक पर्याय उपलब्ध आहेत.

मटणामध्ये बहुतेक करून बकऱ्याचे मटण मिळत असले तरी इथे खास मेंढय़ाचे मटण मिळते. इथे मेंढय़ाचे मटण वापरून तयार केलेले ‘लॅम्ब पिझ्झा’ लाजबाबच आहे. सॉस आणि चीजचा वापर करून ते बनविले जाते. त्यासाठी दररोज तीन ते चार किलो सॉस तयार केले जात असल्याची माहिती कॉर्नरचे मालक प्रसाद नवघरे यांनी दिली.

प्रसाद यांना स्वत: स्वयंपाक करणे आवडते. मीलन नावाच्या एका मित्रासोबत ते पिझ्झा आणि पास्ताचे विविध प्रकार बनवितात. तसे सर्वच प्रकार खवय्यांना आवडतात. मात्र विशेषकरून ‘थीन क्रस्ट ब्रेड’ खवय्यांच्या पसंतीस अधिक उतरत असल्याचेही त्यांनी सांगितले. मांसाहारी पिझ्झामध्ये ‘पामेझान’ नावाचे चीज वापरले जाते तर मोझरेला, पॅकेरिनो हे चीज शाकाहारी पिझ्झामध्ये वापरतात. सॉस करताना विशिष्ट टोमॅटोचा वापर करतात. चीजचे एकूण सात ते आठ प्रकार पिझ्झा आणि पास्तामध्ये वापरले जातात. मॅक अ‍ॅण्ड चीज, अ‍ॅग्लोओ ई ओल्लो, क्रीम फंगी आदी पास्ता येथे मिळतात. याशिवाय गार्लीक ब्रेड फ्रेंच फ्राइज, स्पाइस फ्राइज, चीज गार्लिक ब्रेड, नाचोज, चीज पॉप, ब्रुकेट आदी प्रकारचे शाकाहारी स्टार्टर्स येथे चाखायला मिळतात. चिकन नगेट्स, चिकन पॉप, चिकन ब्रकेट, मिक्स फिश क्रॅकर आदी प्रकारचे मांसाहारी स्टार्टर्स येथे चाखायला मिळतात. ओरिओ शेक हे तरुणाईला आवडणारे थंडगार पेय असल्याचे प्रसाद यांनी सांगितले. ‘गुस्तो पिझ्झोरिया’चे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे पदार्थ शिजविताना ब्रीक ओव्हन, वूड फायर या पद्धतीचा वापर करतात. त्यामध्ये लाकूड वापरले जाते. मात्र पावसाळा असल्यामुळे सध्या या पद्धतीचा वापर करत नसल्याचे प्रसाद याने सांगितले. पिझ्झा करताना फ्रेश पिझ्झा खवयांना खायला मिळावा, यासाठी धडपड करतो, असे प्रसाद यांनी सांगितले. हे दुकान सुरू होऊन आठ-नऊ महिने झाले असून डोंबिवलीकर खवय्यांनी चांगला प्रतिसाद दिल्याचेही त्यांनी सांगितले. येथील ‘सुप्रीम लव्हर्स’ पिझ्झा खवय्ये अधिक आवडीने खातात. यामध्ये विविध भाज्या, सॉस आणि चीजचा वापर केला जातो. त्यामुळे ज्या खवय्यांचा श्रावण आहे, त्यांना सॉसच्या चवीमुळे चटपटीत खाण्याची संधी मिळते. यामध्ये ओरिओ बिस्कीट क्रश, दूध, बर्फ आदी जिन्नस एकत्र करून तयार केलेले मिल्कशेक प्यायले की पोट भरते. या दुकानात बसायला फार जागा नसली तरी येथील वातावरण मनाला प्रसन्न करणारे आहे. तसेच स्वयंपाकघरात काय सुरू आहे हे खवय्यांना इथून सहज दिसते. तेव्हा एका लाजबाब मेजवानीच्या शोधात असाल तर ‘गुस्तो पिझ्झोरिया’ला भेट द्यायला हरकत नाही.

गुस्तो पिझ्झोरिया

  • कुठे?- शॉप नं- ४, आर्चिस बिल्डींग, टंडन रोड, डोंबिवली (पू.)
  • कधी?- सकाळी १२ ते रात्री ११