30 March 2020

News Flash

मेट्रो मार्गरोधकांवर पानाच्या पिचकाऱ्या

एमएमआरडीए मुंबई आणि उपनगरांमध्ये ठिकठिकाणी मेट्रो मार्गाची कामे करीत आहे.

मुंबई-ठाणे मेट्रो मार्गाच्या बांधकामास सुरुवात झाली असून या कामादरम्यान वाहनांच्या सुरक्षेसाठी लावण्यात आलेले लोखंडी मार्गरोधक (बॅरिकेड्स) पान-गुटख्याच्या पिचकाऱ्यांनी रंगले आहेत.

पादचारी, प्रवाशांकडून अस्वच्छता; सफाईसाठी रोज हजारो लिटर पाण्याचा वापर

ऋषीकेश मुळे, ठाणे

मुंबई-ठाणे मेट्रो मार्गाच्या बांधकामास सुरुवात झाली असून या कामादरम्यान वाहनांच्या सुरक्षेसाठी लावण्यात आलेले लोखंडी मार्गरोधक (बॅरिकेड्स) पान-गुटख्याच्या पिचकाऱ्यांनी रंगले आहेत. त्यांची साफसफाई करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) रोज हजारो लिटर पाण्याचा वापर करत आहे. येता जाता पान-तंबाखूची पिंक टाकणाऱ्यांमुळे मार्गरोधकांच्या स्वच्छतेसाठी विशेष यंत्रणाच तैनात करण्याची वेळ एमएमआरडीएवर आली आहे.

एमएमआरडीए मुंबई आणि उपनगरांमध्ये ठिकठिकाणी मेट्रो मार्गाची कामे करीत आहे. ज्या मार्गावरून मेट्रो जाणार आहे त्या भागात बांधकामामुळे वाहतुकीस अडथळा येऊ नये म्हणून आणि खोदकामादरम्यान धूळ उडून रस्त्यावर येऊ नये, म्हणून बांधकाम क्षेत्राभोवती पाच ते सहा फूट उंचीचे मार्गरोधक उभारण्यात आले आहेत. ठाण्यातून जाणाऱ्या वडाळा-घाटकोपर-मुलुंड-ठाणे-कासारवडवली या मेट्रो मार्गिकेचे काम सुरू झाले आहे. बांधकामाच्या दुतर्फा मार्गरोधक लावण्यात आले आहेत. रात्री वाहनचालकांना रोधक दिसावेत यासाठी अंधारात चमकणाऱ्या काळ्या आणि पिवळ्या पट्टय़ा या पत्र्यांवर रंगवण्यात आल्या आहेत. मेट्रो प्रकल्पाची माहिती देणारे विविध संदेश त्यावर देण्यात आले आहेत. मात्र काही बेशिस्त नागरिक या पत्र्यांचा वापर पिकदाणीसारखा करीत आहेत. पान-गुटख्याच्या असंख्य पिचकाऱ्या त्यावर टाकल्या जात आहेत. त्यामुळे एमएमआरडीएने नेमलेले कंत्राटदार अक्षरश हैराण झाले आहेत.

नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून एमएमआरडीएकडून दररोज मार्गरोधक स्वच्छ केले जात आहेत. बांधकाम कर्मचारी पाणी टाकून ते धुतात. एका वाहनात पाण्याची टाकी ठेवून दोन कर्मचारी टप्प्याटप्प्याने प्रत्येक रोधक स्वच्छ करतात. त्यामुळे दररोज हजारो लिटर पाणी वाया जात आहे, अशी माहिती एमएमआरडीएतील वरिष्ठ सूत्रांनी दिली.

१४ हजार ५४९ कोटी रुपये खर्च करून बांधण्यात येणारा मेट्रो चार मार्ग ३२ किलोमीटरचा आहे. त्याचे बांधकाम सुरू असतानाच नागरिक स्वच्छतेविषयी एवढे उदासीन असतील, तर प्रत्यक्षात मेट्रो सुरू झाल्यानंतर तेथील स्वच्छतेचा प्रश्न किती गंभीर होईल, याचा अंदाज येत असल्याची चर्चा आहे.

नागरिकांनी स्वच्छता राखावी

बांधकामाच्या ठिकाणी माती, दगड मोठय़ा प्रमाणात बाहेर पडतात. त्याचा त्रास होऊ नये हा रोधक लावण्यामागचा उद्देश असतो. मात्र पानाच्या पिचकाऱ्यांमुळे मार्गरोधकांवरील सुरक्षादर्शक पट्टय़ादेखील दिसेनाशा होत आहेत. या पिचकाऱ्यांचे डाग रोज स्वच्छ करावे लागत आहेत. नागरिकांनी जबाबदारी समजून घ्यायला हवी. घराप्रमाणेच सार्वजनिक ठिकाणेही स्वच्छ ठेवणे गरजेचे आहे, अशी प्रतिक्रिया मेट्रो चारच्या वरिष्ठ अभियंत्यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 9, 2019 12:39 am

Web Title: gutka tobacco spit by pedestrians on metal barricades used for vehicles safety
Next Stories
1 उद्वाहने अनधिकृत
2 कोमात गेलेले बाळ तब्बल ४० दिवसांनंतर शुद्धीवर
3 गंमत म्हणून स्वत:चं अपहरण करणारा भामटा गजाआड
Just Now!
X