काळा तलाव परिसरातील तरुण वर्गात नाराजीचा सूर; आदित्य ठाकरे यांचे आश्वासन निवडणुकीपुरतेच
कल्याणचे ऐतिहासिक वैभव असलेल्या काळा तलाव परिसर अतिशय सुंदर व निसर्गरम्य करण्यात आला आहे. निसर्गाच्या सान्निध्यात व्यायाम करण्यासाठी ज्येष्ठ नागरिक, तरुण मंडळी येथे मोठय़ा प्रमाणात येत असल्याने त्यांच्या सोयीसाठी महापालिकेने काही वर्षांपूर्वी ओपन जीम सुरू केली. याचा फायदा नागरिक घेत असले तरी रात्री ८ नंतर ही जीम बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने सायंकाळी उशिरा घरी परतून काळा तलावाच्या दिशेने धाव घेणाऱ्यांचा मात्र हिरमोड झाला आहे. सायंकाळी उशिरा व्यायाम करणारे अनेक जण आहेत. त्यामुळे ही व्यायामशाळा बंद करून आठनंतर व्यायाम करू नका, असा संदेश महापालिकेस द्यायचा आहे का, असा सवाल काही तरुण उपस्थित करत आहेत.
काळा तलाव ही कल्याणची ऐतिहासिक ओळख आहे. नागरिक आपल्या आरोग्याच्या दृष्टीने आता सजग झाले असल्याने दैनंदिन जीवनात व्यायाम करण्यासही त्यांनी प्राधान्य दिले आहे. सर्वसामान्य नागरिकांना किंवा नोकरदार वर्गाला शहरातील व्यायामशाळेत त्या त्या वेळेत जाणे जमतेच असे नाही. अशा नागरिकांसाठी शिवसेनेने ओपन जीम ही संकल्पना पुढे आणली. महापालिकेच्या अर्थसंकल्पात ओपन जीमसाठी निधी उपलब्ध झाल्याने शहरात ओपन जीम ठिकठिकाणी सुरू करण्यात आल्या. कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या तोंडावर कल्याण येथील काळा तलावाच्या उद्यानात युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते या जीमचे उद्धाटन दिमाखात करण्यात आले. पाच लाख रुपये खर्च करून सात प्रकारच्या व्यायामांचे साहित्य बसविण्यात आले. ही जीम सर्वसामान्यांसाठी २४ तास खुली असेल असे आश्वासनही देण्यात आले. मात्र दुपारी एक नंतर तसेच सायंकाळी ८ नंतर ही जीम बंद ठेवण्यात येत असल्याने विशेषत तरुण वर्गात नाराजीचा सूर व्यक्त होत असून रात्री आठनंतरही व्यायामशाळा सुरू रहावी अशी मागणी होत आहे.

हिवाळा असल्याने तरुण वर्ग या मोसमात व्यायामाला प्राधान्य देतो. शरीराबरोबर मनालाही प्रफुल्ल करणारा, शरीरातील अग्नी प्रदीप्त करुन आतून ऊब देणारा व्यायाम या दिवसात केला जातो. काही मुलांना जिममध्ये येऊन व्यायाम करणे परवडत नाही. अशांना ओपन जिम हा चांगला पर्याय आहे. चालणे, पळणे, जॉिगग करणे, योगासने, सायकल चालवणे, जोर काढणे, दंड बैठका काढणे आदि व्यायाम सर्व नागरिक करु शकतात. असेच साहित्य येथे असल्याने ते सर्वासाठी त्यांच्या वेळेत खुले ठेवावे अशी अपेक्षा.
-करण भगत, व्यायामतज्ञ

नोकरदार मंडळींना सकाळी जिमला जाणे जमेलच असे नाही. सायंकाळी सात आठ नंतरच घरी सगळे परतताच आठ ते दहा या वेळेत अनेक तरुण या जिमचा लाभ घेऊ इच्छितात. परंतू ही जिम या वेळी बंद असल्याने याचा आम्हाला उपयोग होत नाही.
-सचिन वेलदे, नागरिक.

उद्यान ज्यावेळी बंद असते त्यावेळी जिमही बंद करण्यात येते. सकाळी सायंकाळी व्यायामशाळा खुली असते. परंतु दुपारी १ ते ४ व रात्री ८ नंतर जिम बंद करण्यात येते. याचे कारण येथील लहान मुले विनाकारण या साहित्यांवर बसून ते यंत्र बिघडवतात. यापूर्वी अशा घटना घडल्याने आम्ही दुपारी व रात्री जिम बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
-श्रेयस समेळ, नगरसेवक