tv10महाराष्ट्रातील प्रत्येक गाव आणि शहराप्रमाणे ठाणे शहरालाही तालमीची मोठी परंपरा आहे. पूर्वीच्या काळातील बलोपासनेची परंपरा सध्याच्या काळात खूपच बदलली आहे. त्याचे रूपांतर एका व्यवसायामध्ये होऊन गेले आहे. एके काळी पैसे कमावण्यासाठी घाम गाळावा लागतो, असे म्हटले जात होते. मात्र व्यायामशाळेच्या व्यवसायाने दुसऱ्यांना घाम गाळायला लावून पैसे कमावण्याचा नवा पायंडा पाडला आहे. लाल मातीचा धुरळा, अंगाला तेल लावून मॉलिश करण्याची हौस आजच्या काळातही तशीच असली तरी त्याचे रूपांतर आता ‘हेल्थ क्लब’ आणि ‘फिटनेस सेंटर’ नावाच्या स्वतंत्र वातानुकूलित संस्कृतीमध्ये झाले आहे. शंभर रुपयांच्या मासिक शुल्कापासून ते दहा हजारांच्या मासिक शुल्कापर्यंतच्या व्यायामशाळा आणि हेल्थ क्लब सध्या ठाणे शहरामध्ये आहेत.  
मुंबई शहराला खेटून उभ्या असलेल्या ठाणे शहरामध्ये मुंबईप्रमाणेच सगळ्याच आधुनिक गोष्टींचा अंगीकार तात्काळ झाला आहे. व्यायामाच्या बाबतीतही तो अपवाद ठरलेला नाही. पूर्वीच्या काळी कबड्डी संघ आणि व्यायामशाळांच्या माध्यमातून अंगातील रग शमविणारी तरुणाई नव्याने अवतरलेल्या वातानुकूलित जिममध्येही तितकीच रमली आहे. ठाणे, कळवा, डोंबिवली आणि कल्याण शहरांप्रमाणेच परिसरातील ग्रामीण भागांमध्ये मोठय़ा प्रमाणात तालमी असून त्यांच्यातून मोठय़ा प्रमाणात शरीरसौष्ठव खेळाडू घडवण्याची एक मोठी परंपरा वीस वर्षांपूर्वी या परिसरामध्ये होती. दंडबैठका आणि सूर्यनमस्कारांबरोबर व्यायामाच्या साहित्यांवर या व्यायामशाळा सुरू असत. तरुणांनीच एकत्र येऊन सुरू केलेल्या या व्यायामशाळा अत्यंत अल्प दरामध्ये तरुणांना व्यायाम करण्याची सुविधा उपलब्ध करून देत होत्या. आजही अनेक जुन्या संस्था अत्यल्प दरामध्ये तरुणांना व्यायाम करण्यासाठी प्रोत्साहित करत आहेत. शहरातील तरुणांनी सुरू केलेल्या या व्यायामशाळा हळूहळू मुलींसाठीही खुल्या करण्यात आल्या. खो-खो, आटय़ापाटय़ा, हुतुतू अशा मैदानी खेळांबरोबरच अनेक संस्थांच्या क्रीडा स्पर्धा होऊ लागल्या. पुढील काळात व्यायामशाळेतील व्यायामाची मक्तेदारी संपून क्लबच्या अंगाने व्यायामशाळांचा विकास होऊ लागला. त्यातूनच खासगी जिमखान्यांची संकल्पना पुढे येऊ लागली. पूर्वीच्या तालमींमध्ये मल्लखांब, दोरीवरचा मल्लखांब, दंडबैठका, रायफल शूटिंग, रस्सीखेच, गदा फिरविणे, आखाडे खणणे यांसारखे अनेक व्यायाम प्रकार तसेच वैयक्तिक व सांघिक खेळ खेळले जात होते. त्यांच्यामध्ये बदल घडून व्यायामशाळांनी आधुनिक रूप घेण्यास सुरुवात केली.
ठाणे शहराच्या विकासाबरोबरच व्यायामाच्या प्रकारामध्ये मोठे बदल घडत गेले. वाढती लोकसंख्या, बदललेली जीवनशैली आणि जागतिकीकरणामुळे हे बदल होत गेले. लाल मातीची जागा शाहबादी फरशा आणि मॅटने घेतली. गदेची जागा डंबेल्सने घेतली आणि मूळच्या जोर-बैठकाच डिप्स आम्र्सने म्हणून नव्याने प्रचलित झाल्या. त्यामुळेच पूर्वीच्या पारंपरिक तालमीचे व्यापारीकरण सुरू झाले. व्यायामशाळा ‘हेल्थ क्लब’ आणि ‘फिटनेस सेंटर’ नावाच्या आकर्षक रूपाने ओळखली जाऊ लागली. तालमींचे व्यापारीकरण होऊन तिचे रूपांतर जिममध्ये झाले. मात्र त्याच्या मूळ स्वरूपात फार काही बदल झाले नाहीत. आधी मार्गदर्शक, मास्तर असत. आता मार्गदर्शक म्हणून ट्रेनर, गाईड आहेत. बदल झाला असेल, तर तो केवळ मोजाव्या लागणाऱ्या पैशांमध्ये झाला आहे. तालमीत जाण्यासाठी पैसे लागत नसत. तेथे केवळ खुराकावर लक्ष देणे इतकेच व्यायामप्रेमींचे काम होते. मात्र जिममध्ये मेंबरशिपखेरीज प्रवेश मिळत नाही. हजारांत शुल्क मोजावे लागते. तालमी आणि व्यायामशाळांच्या काळात विनाखर्च बलसंवर्धन होत होते. आता बलसंवर्धनामध्येही यांत्रिकीकरण शिरले आहे. जिम हा प्रकार हेल्थ क्लबला समांतर झाला असून डाएटच्या टिप्स, योग यांचा त्यात अंतर्भाव झाला आहे. जिम हा प्रकार सर्वसामान्यांसाठी नसून उच्चमध्यमवर्गीय आणि श्रीमंतांसाठीच आहे असा एक समज असला तरीही तरुणाई मोठय़ा संख्येने जिममध्ये जाताना दिसते आहे. मैदानी व सांघिक खेळांची कमतरता जिममध्ये जाणवत असल्याने सांघिकवृत्ती, लोकाभिसरण या गुणांचा त्या ठिकाणी विकास होत नाही.
धकाधकीच्या जीवनात शरीर कमावण्याकडे लक्ष देण्यास अनेकांना वेळ नाही. या परिस्थितीत वेटलॉस, बॉडीबिल्डिंग व जनरल फिटनेस व्यायाम, अशी व्यायामाची वर्गवारी करून तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार व्यायाम ठरवून त्याप्रमाणे जिममध्ये प्रशिक्षण दिले जाते. यात प्रत्येकाच्या डाएटचाही विचार केला जातो. फ्री वेट स्टेशन, मल्टिजिम, टोटल जिम कन्सेप्ट, स्मिथ मशीन मल्टिकॉम्बिनेशन, ट्रेडमिल्स, रोअर, स्टेशनरी बाइक्स इत्यादी उपकरणांचा समावेश जिममध्ये असल्यामुळे तंत्रज्ञानाचा वापर करून व्यायाम केला जात आहे. तसेच या जिममध्ये एसी रूम व लोकांच्या सोयीनुसार व्यायामाच्या विविध स्कीम्सही आखल्या जातात. व्यायामशाळा, तालीम ते जिम हा प्रवास आता दिखाऊ महागडे स्वरूप धारण करू लागला आहे. आखाडे, बलोपासना यांच्याशी देशभक्ती आणि सामाजिक चळवळींचा एके काळी जवळचा संबंध होता. आता स्वातंत्र्य आणि एकांत अनुभवत जिममधील व्यायामाचा आनंद घेणाऱ्यांची संख्या कमालीची वाढली आहे. व्यायाम ही एक वैयक्तिक बाब झालेली आहे. वेट ट्रेनिंग मॅट, डम्बेल्स, बेंच, बॉल्स यांसारख्या कमी वजनाच्या, कुठेही ठेवता येणाऱ्या साहित्याचा वापर व्यायामासाठी केला जात आहे. त्यामुळे अनेकांनी घरातच जिम थाटले आहे. व्यायाम करताना घाम येऊ  नये यासाठी अँटिस्वेट कापडापासून तयार केलेल्या टी-शर्ट्सचा वापर होऊ लागला आहे. आकर्षक शूज आणि सॉक्सही जोडीला असतात. ‘सिक्स पॅक अ‍ॅब्ज’ची क्रेझ तरुणाईमध्ये निर्माण झाली आहे. व्यायामाचे महत्त्व ज्ञात झालेली व एके काळी लाल मातीत लोळणारी तरुणाई आता वातानुकूलित खोल्यांमध्ये हॅलोजन बल्बच्या प्रकाशात शरीर पीळदार करण्याकडे लक्ष पुरवत आहे. त्यामुळे पूर्वीचा व्यायाम हा एक व्यवसाय म्हणून नावारूपाला आला आहे.