स्पर्धक खेळाडूकडूनच परीक्षणाचे काम; अन्य स्पर्धकांच्या पालकांची महापौरांकडे धाव
ठाणे महापौर चषक रिदमिक जिम्नॅस्टिक स्पर्धेत वरिष्ठ गटात खेळणाऱ्या स्पर्धक खेळाडूनेच लहान गटासाठी परीक्षणाचे काम केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, या स्पर्धेत सहभागी झालेल्या काही विद्यार्थ्यांच्या पालकांनीच यासंबंधीच्या तक्रारी महापौर संजय मोरे आणि आयुक्त संजीव जयस्वाल यांच्याकडे केल्या आहेत. शहरातील विविध क्रीडा संघटनांकडे या स्पर्धाच्या आयोजनाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. असे असताना काही क्रीडा प्रकारांमध्ये आयोजक संस्थेने स्वतच्या खेळाडूंच्या हितासाठी इतर खेळाडूंवर दुजाभाव केल्याच्या तक्रारी पुढे आल्याने या स्पर्धा आयोजनातील खिलाडूवृत्तीला धक्का पोहचला आहे.
ठाणे महापालिकेच्या वतीने शहरातील खेळाडू, कलाकारांना व्यासपीठ मिळावे या उद्देशाने ‘महापौर चषक कला क्रीडा महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले होते. सुमारे पंधरा दिवस चाललेल्या या महोत्सवात सगळ्या खेळांचा समावेश करण्यात आला होता. या महोत्सवातील रिदमिक जिम्नॅस्टिक स्पर्धेदरम्यान पक्षपात करण्यात आल्याचा आरोप सहभागी स्पर्धकांच्या पालकांनी केला आहे. या स्पर्धेत मोठय़ा गटामध्ये स्पर्धक असलेल्या अनेकांनी लहान गटातील विद्यार्थ्यांच्या स्पर्धेत परीक्षक म्हणून काम केल्याचा आरोप पालकांनी केला आहे. त्याबरोबरच खेळाडूंचे सादरीकरण झाल्यानंतर कोणत्याही प्रकारचे गुण हे परीक्षकांनी स्पर्धकांना दिलेच नाहीत. त्यामुळे स्पर्धेत कोणत्याही स्पर्धकांचे गुण जाहीरच झाले नाहीत, असा दावाही या विद्यार्थ्यांच्या पालकांनी केला आहे. काही ओळखीच्या स्पर्धकांना सादरीकरण विसरल्यानंतर त्यांना दुसरी संधी देण्याचे औदार्यही या स्पर्धेत दाखवण्यात आले.
स्पर्धा सुरू असताना नि:पक्ष परीक्षक बोलावण्याची मागणी करूनही रिदमिक जिम्नॅस्टिक फेडरेशनचे सचिव बाळासाहेब ढवळे यांनी ती फेटाळून लावली, अशी तक्रार सरस्वती क्रीडा संकुलातील खेळाडूंच्या पालकांनी केली आहे. सुनील घाडगे, रेखा झिंगे, स्वाती पाटील, उषा आपटे
अपर्णा आपटे, वर्षां देशपांडे, प्रमोद गांगुर्डे, रुचिता वेखंडे, चारुशीला आठल्ये, प्राजक्ता जोशी आणि गिरीश लवंदे अशी तक्रारदार पालकांची नावे आहेत.

ठाणे महापालिकेचा क्रीडा विभाग या स्पर्धेचा प्रमुख आयोजक असला, तरी या स्पर्धेची तांत्रिक बाजू सांभाळण्याची पूर्ण जबाबदारी त्या खेळाच्या असोसिएशनची असते. रिदमिक जिम्नॅस्टिक स्पर्धा जिल्हा रिदमिक जिम्नॅस्टिक असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने झाल्या असून त्यातील पंच, परीक्षकांची निवड ही असोसिएशन करते. या पालकांनी तक्रार केली असली तरी कोणाची बाजू योग्य आहे हे पाहण्यासाठी असोसिएशन आणि स्पर्धकांची संयुक्त बैठक घेऊन निर्णय घेता येऊ शकेल.
– मीनल पालांडे, ठाणे महापालिका क्रीडा अधिकारी

ठाणे जिल्हा रिदमिक जिम्नॅस्टिक असोसिएशनने कोणावरही अन्याय केलेला नसून केवळ चांगले काम करत असल्यामुळे आरोप होत आहेत. ऐनवेळी उपलब्ध मनुष्यबळावर या स्पर्धा पार पाडायच्या असल्याने काही स्पर्धकांनी परीक्षण करावे असा निर्णय घेण्यात आला. या स्पर्धा कशा पद्धतीने पार पडल्या या सगळ्याचा अहवाल संचालक पूजा सुर्वे यांच्याकडून मागविला आहे. पालकांनी तांत्रिक गोष्टींसाठी संघटनेकडे चर्चा करण्याची गरज होती. मात्र त्यांनी तसे न करता मुख्य आयोजकांकडे तक्रार केल्यामुळे कदाचित पुढील वर्षी या स्पर्धा होणार नाहीत. त्यामुळे याचा फटका खेळाला बसू शकतो याचे भान पालकांनी राखणे गरजेचे आहे.
– बाळासाहेब ढवळे,
सचिव, ठाणे जिल्हा जिम्नॅस्टिक असोसिएशन