किशोर कोकणे

कापड उद्योगासाठी प्रसिद्ध असलेल्या भिवंडी शहरातील ५० टक्के यंत्रमाग व्यवसाय अद्यापही बंद असल्याचे वास्तव समोर आले आहे. टाळेबंदीच्या काळात निर्माण झालेल्या परिस्थितीत यंत्रमाग उद्योग दोन महिने उलटूनही पूर्णत: उभे राहू शकलेले नाहीत. कापडाला मागणी नसल्यामुळे या यंत्रमागांतून जेमतेम ६०० मीटर कापडच तयार केले जात आहे. कामगारांच्या टंचाईमुळे यंत्रमाग पूर्ण क्षमतेने चालवणेही कठीण बनले आहे.

देशात करोनाचा प्रादुर्भाव वाढत असून त्याचा परिणाम सर्वच क्षेत्रांत जावणत आहे. भिवंडी शहर हे देशातील कापड निर्मितीचे शहर म्हणून देशात ओळखले जाते. या शहरात एकूण ६ लाख यंत्रमाग आहेत. यंत्रमागावर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे लाखो कामगार काम करतात. दररोज या यंत्रमागातून कोटय़वधी रुपयांचे कापड तयार होत असते. ६० ते ७० टक्के कापड देशातील विविध राज्यांत तसेच ३० ते ४० टक्के कापड व्हिएतनाम, बांगलादेश अशा विविध देशांतही पाठविले जाते. करोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर भिवंडीतील यंत्रमाग व्यवसायाला उतरती कळा लागली आहे. राज्यात करोनाचा फैलाव वाढू लागल्यानंतर यंत्रमागावर काम करणारे अनेक मजूर उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, बंगाल, तेलंगणा येथे निघून गेले. त्यानंतर मे महिन्यात व्यावसायिकांनी केलेल्या मागणीनुसार यंत्रमाग सुरू करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली. दोन महिने उलटूनही हा व्यापार अद्याप पायावर उभा राहिलेला नाही.

अपुरे कामगार, कच्चा माल उपलब्ध न होणे, व्यावसायिकांवर निर्माण झालेले कर्जाचे डोंगर, इतर राज्यांतील बंद असलेली लहान दुकाने यामुळे भिवंडीतील ५० टक्के यंत्रमाग अद्यापही बंद स्थितीत आहेत. अनेक कपडा व्यापारी त्यांचा जुना शिल्लक तयार कपडे माल अथवा कापड विक्री करत आहेत. त्यांच्याकडून मागणीच नाही असे भिवंडीतील हातमाग व्यवस्थापनांचे म्हणणे आहे. जुना कापड माल अद्याप बाजारात संपलेला नाही. तर, नवे कापड का तयार करायचे असा प्रश्न त्यांच्याकडून विचारला जात आहे. अनेक छोटय़ा व्यापाऱ्यांनी मार्च महिन्यांत दिलेले कापडाचे पैसेही यंत्रमाग मालकांना दिलेले नाहीत. त्यामुळे ऐन उत्सवांच्या

काळात यंत्रमाग व्यवसायावर कर्जाचा डोंगर तयार झाला आहे. त्यामुळे आता यंत्रमाग व्यवसाय टिकविण्याचे मोठे आव्हान या व्यावसायिकांसमोर आहे.

देशात भिवंडी शहरातून मोठय़ा प्रमाणात कापड देशविदेशात जाते. मात्र, या वर्षी करोनाचा प्रादुर्भाव असल्याने यंत्रमाग व्यावसायिकांना व्यवसाय चालविणे कठीण झाले आहे. आम्ही हा व्यवसाय सुरू राहावा यासाठी कामगारांशी संपर्क साधत असतो. दोन महिन्यांपासून आम्ही स्थानिक कर्मचाऱ्यांच्या मदतीने व्यवसाय सुरू ठेवला आहे. मात्र, कापडाची मागणी नाही. त्यामुळे ५० टक्के यंत्रमाग अद्याप बंदच  आहेत.

– पुरुषोत्तम वंगा, अध्यक्ष, भिवंडी पद्मानगर पॉवरलूम विव्हर असोसिएशन.