News Flash

टीएमटीत ज्येष्ठांना अर्धे तिकीट

ठाणे महापालिका क्षेत्रातील ज्येष्ठ नागरिकांना टीएमटीच्या मासिक भाडय़ात २० टक्के सवलत दिली जाते

सर्वसाधारण सभेची मान्यता; सवलतीत ३० टक्के वाढ

ठाणे : ठाणे महापालिका परिवहन उपक्रमाच्या प्रवासी बसभाडय़ात ज्येष्ठ नागरिकांना सवलत देण्यासंबंधीच्या प्रस्तावास नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत अंतिम मान्यता देण्यात आली. त्यामुळे ठाण्यातील पाच हजारांहून अधिक ज्येष्ठ नागरिकांना बसच्या भाडय़ात ५० टक्के सवलत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या सवलतीमुळे परिवहन उपक्रमावर तब्बल पाच कोटी १० लाख रुपयांचा बोजा पडणार आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रातील ज्येष्ठ नागरिकांना टीएमटीच्या मासिक भाडय़ात २० टक्के सवलत दिली जाते. ही योजना २००६ पासून लागू करण्यात आली आहे. मात्र तिचा ज्येष्ठ नागरिक लाभ घेत नसल्याची बाब समोर आली आहे. ६५ वर्षांवरील प्रवाशांना राज्य परिवहन सेवेच्या बस भाडय़ात ५० टक्के, नवी मुंबई परिवहन उपक्रमात ७५ टक्के सवलत दिली जाते. बेस्ट उपक्रमात मासिक भाडय़ात ५० रुपये तर त्रमासिक भाडय़ात २०० रुपये सवलत दिली जाते. राज्य परिवहन आणि नवी मुंबई परिवहन उपक्रमातील सवलतींच्या तुलनेत टीएमटीची सवलत फारच कमी आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना प्रवासी भाडय़ात ५० टक्के सवलत देण्याची मागणी नगरसेवकांकडून करण्यात येत होती. या पाश्र्वभूमीवर परिवहन उपक्रमाने ज्येष्ठांना प्रवासी भाडय़ात ५० टक्के सवलत देण्याचा प्रस्ताव तयार केला होता. या प्रस्तावास वर्षभरापूर्वी परिवहन समितीच्या बैठकीत मिळाली होती. त्यानंतर हा प्रस्ताव सर्वसाधारण सभेपुढे अंतिम मान्यतेसाठी सादर करण्यात आला होता.

पाच हजार ज्येष्ठ नागरिक..

ठाणे तहसील कार्यालयाकडून शहरातील ६५ वर्षांवरील नागरिकांना ओळखपत्र वितरित करण्यात येते. २०१६-१७ या वर्षांमध्ये तहसील कार्यालयातून ५ हजार २७६ जणांना ज्येष्ठ नागरिकांची ओळखपत्रे देण्यात आली आहेत.

पाच कोटींचा भार..

ठाणे परिवहन उपक्रमाच्या प्रवासी भाडय़ात ज्येष्ठ नागरिकांना ५० टक्के सवलत दिली तर परिवहन उपक्रमावर पाच कोटी १० लाख ३२ हजार ११० रुपयांचा आर्थिक बोजा पडणार आहे. तहसील कार्यालयातील नोंदणीनुसार ५ हजार २७६ ज्येष्ठ नागरिक आहेत. त्यांचा दिवसातून दोनदा बसमधून प्रवास होईल, असे ग्राह्य़ धरण्यात आले आहे. त्याआधारे वार्षिक तुटीचा आकडा काढण्यात आला आहे. या तुटीची रक्कम महापालिका परिवहन उपक्रमाला अनुदान स्वरूपात देण्यात येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 29, 2018 2:06 am

Web Title: half tickets for senior citizen in tmt bus
Next Stories
1 तळीरामांसाठी फिरते ‘सापळे’
2 धकाधकीच्या जीवनशैलीत आरोग्यभान अत्यावश्यक
3 धकाधकीच्या जीवनशैलीत आरोग्यभान अत्यावश्यक
Just Now!
X